मठगावच्या निसर्गरम्य परिसरात वैभव महिला मंडळाचे वनभोजन : प्राचीन महादेव मंदिर आणि परिसराचा इतिहास घेतला समजून

मठगावच्या निसर्गरम्य परिसरात वैभव महिला मंडळाचे वनभोजन :
प्राचीन महादेव मंदिर आणि परिसराचा इतिहास घेतला समजून
सिंहवाणी ब्युरो / पाटगाव
गारगोटी येथील वैभव महिला मंडळाच्या वतीने “एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात “या अंतर्गत भुदरगड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते मठगाव येथील एक हजार वर्षांपूर्वीच्या महादेव मंदिर परिसरात हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी महादेव मंदिर आणि मठगाव परिसराचा इतिहासाचा पट जेष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांनी महिलांसमोर मांडला.
गारगोटी येथून विशेष ट्रॅव्हल बसने महिला मठगाव येथील महादेव मंदिरात पोहोचल्या. मंदिर परिसरात दगडांच्या चुली मांडून आणि जंगलातील लाकडे गोळा करून भात, वरण्याची आमटी, भरली मसाला वांग्याची भाजी असा स्वयंपाक केला. दरम्यान छोटे छोटे खेळ घेतले.
महादेव मंदिराचा इतिहास एक हजार वर्षांपूर्वीचा
मठगाव पाटगाव परिसराचा इतिहास खूप जुना आहे सुमारे एक हजार वर्षां पूर्वीपासून या परिसरात शिलाहार वंशाचे राज्य होते. याच वंशातील राजा भोज राजा द्वितीय याने ई स 1175 ते 1205 च्या दरम्यान पन्हाळा गगनबावडा गडहिंग्लज येथील सामानगड, भुदरगड, रांगणा, विजयदुर्ग हे किल्ले बांधलले. याच कालावधीमध्ये मठगावच्या मंदिराचे बांधकाम झाले, याबरोबरच खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर याच राजाने बांधले. मठगाव येथील महादेव मंदिर तीन मजली व विशाल असे होते. येथील समाज समृद्ध आणि संपन्न असा होता. हे मंदिर 17 व्या शतकात मोगलानी पाडून टाकले. मंदिराचा गाभारा पाडत असताना गाभाऱ्यातून लाखो मधमाशा बाहेर आल्या आणि मुघल सैन्य पळून गेले. यानंतर या मंदिराचे विखुरलेले अवशेष एकत्र करून येथील नागरिकांनी या मंदिराची पूजा पूर्ववत सुरू केली. त्यानंतर पुन्हा 1980 च्या दरम्यान का मुस्लिम तहसीलदाराने देवस्थानची शेकडो एकर जमीन एका मुस्लिम कुटुंबीयांना देऊन टाकली. याबाबत मी आणि गावकऱ्यांनी सतत 23 वर्षे लढा दिला. आज हे मंदिर गावकऱ्यांकडे आहे. मंदिराच्या परिसरातील जमीन सरकारकडे आहे. ही जमीन परत मिळवायची आहे मंदिराच्या भोवती सुविधा निर्माण करायच्या आहेत आणि मंदिराची उभारणी करावयाची आहे. गावकरी त्या दृष्टीने एकजुटीने प्रयत्न करीत आहेत, असे ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वैभव महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी ठाकूर, सचिव वासंती भाट, अंजली देसाई, छाया मोरे, डॉक्टर आशा देसाई, छाया देवर्डेकर, दीपा बापट, राजश्री सावर्डेकर, वर्षा मासाळ, शकुंतला पाटील, प्रीती जोशी, सुवर्णा पाटील, सुमन वास्कर, उज्वला पाटील, सुप्रिया सूर्यवंशी, सुमन माने, तेजश्री भुरके, सुलभा आबिटकर, सरिता पाटील, वंदना गुंड, अंजली पाटील, अनुराधा कोल्हे पाटील, प्रेयशा आबिटकर, वनमाला भाट, देसाई मॅडम, यशोमती बेलेकर, भारती यादव, अनिता खेडेकर , आदी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन रेखा आबिटकर यांनी केले.