क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूदरगड तालुक्यात चोरीच्या घटनात वाढ : दागिने, मोटारसायकल चोरीला : देऊळवाडी येथे भर दिवसा घरफोडी ; अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला:

भूदरगड तालुक्यात चोरीच्या घटनात वाढ : दागिने, मोटारसायकल चोरीला :


देऊळवाडी येथे भर दिवसा घरफोडी ; अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला:

सिंहवाणी / किशोर आबिटकर, गारगोटी :
देऊळवाडी (ता. भुदरगड) येथे आज दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करत सोने व चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. या प्रकरणी बाजीराव पांडुरंग ढेरे (रा. देऊळवाडी) यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुदरगड तालुक्यात अलीकडे चोऱ्यांच्या घटनांत वाढ झाली आहे.
ढेरे कुटुंबीय सोमवारी दुपारी काही वेळासाठी घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. घराच्या मागील बाजूचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी तिजोरी उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घरफोडीत अंदाजे २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.भर दिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांमार्फत पुरावे संकलनाचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध दिशांनी तपास करत आहेत.

भुदरगड तालुक्यात अलीकडे चोऱ्यांच्या घटनांत वाढ


गारगोटी शहरासह भुदरगड तालुक्यात चोरीच्या घटनांचे वाढ होत आहे. गेल्या बुधवारी गोंजारी हॉस्पिटल परिसरात काही महिलांनी एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरले. पळून जात असताना या महिलांना शिवाजीनगर परिसरातील लोकांनी आणि उपस्थितानी चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच जाग्यावर भुदरगड पोलीस येऊन महिलांना गाडीत घालून घेऊन गेले या घटनेबाबत भुदरगड पोलिसांशी संपर्क साधला असता कोणाचीही तक्रार नाही, कोणतीही फिर्याद नाही, त्यामुळे कोणाला ताब्यात घेतले नाही. असे उत्तर देण्यात आले होते. गारगोटीच्या आठवडी बाजारात नेहमीच बाहेर गावाहून वीस पंचवीस चोरीच्या उद्देशाने बायका येतात, मोबाईल चोरणे पाकीट मारणे, छोट्या-मोठ्या चोऱ्या करणे आणि जमल्यास दागिने चोरणे अशा घटना नेहमीच घडत असतात. चोरी किरकोळ असल्यामुळे अनेकदा तक्रारी केल्या जात नाहीत. पण यावेळी चोरी केलेल्या महिलांना रंगेहात पकडले असतानाही त्यांना का सोडण्यात आले? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. याबाबत अनेकदा वृत्तपत्रातून बातम्या येऊनही भुदरगड पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला आहे की काय? अशी चर्चाही होताना दिसत आहे.

दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरी

नवीन प्रांत ऑफिसच्या समोरुन भुदरगड तालुका डिजिटल मीडिया अध्यक्ष राजेंद्र दबडे, यांची गाडी हिरो होंडा पॅशन प्रो रेड ब्लॅक कलर… चोराने अर्धा तास रेकी करून चोरून नेली, सदर ची घटना शनिवारी 27/12/2025 रोजी झाली असून संध्याकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी मोटरसायकल चोराने दुकानपासून थोड्या अंतरावर गाडी ढकलत नेऊन चालू करून घेऊन गेला आहे.. सदर ची कल्पना भुदरगड पोलीस ठाण्याला देऊन सुद्धा त्यांनी प्रांत ऑफिस चे सीसीटीव्ही चेक करण्याची तसदी घेतली नाही. आज 9 दिवस झाले पण पोलिस स्टेशनने सीसीटीव्ही चेककरण्याची तसदी घेतली नाही..भुदरगड पोलीस स्टेशन ची सीसीटीव्ही ही बंद असून गारगोटी शहराचा संपूर्ण सुरक्षेचा विषय हा रामभरोसे आहे. याच दरम्यान निष्णप येथील लक्ष्मी मंदिर येथे सुद्धा चोरी झाली असून मागील काही दिवसामध्ये अजून 2 मोटारसायकल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.. त्याच्या ही तपासामध्ये काही प्रगती नाही. दिवसाढवळ्या लोकांच्या गाड्या चोरीला जात आहेत

निष्णप येथील जागृत देवस्थानांमध्ये चार लाखांची चोरी
: देवींचे डोळेही लंपास ; भावीकांच्यात संतापाची लाट
भुदरगड तालुक्यातील निष्णप येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी व काळम्मा देवीच्या मंदिरांची कुलपे फोडून सुमारे चार लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला. विशेष म्हणजे चोरट्यांनी देवींचे सोन्याचे डोळेही काढून नेल्याने भाविकांच्या भावना तीव्र दुखावल्या असून, संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यात गेल्या महिन्याभरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता देवस्थानांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. निष्णप येथील महालक्ष्मी मंदिर हे जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. सायंकाळी पुजारी अरविंद वसंत गुरव यांनी कुलूप लावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडताच कुलूप तोडलेले, देवीचे दागिने गायब आणि देवीचे सोन्याचे डोळे काढून नेल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी देवीच्या डोळ्यांतील सोन्याचे दागिने, गळ्यातील मंगळसूत्र, दोन चांदीच्या पादुका तसेच सुमारे एक किलो वजनाची चांदीची छत्री असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच रात्री गावातील काळम्मा देवीच्या मंदिरालाही लक्ष्य करून सोन्याचे डोळे, मंगळसूत्र व चांदीचे पैंजण असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दोन मंदिरांतील सलग चोरी ही पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. चोरट्यांची मजल देवतांचे डोळे काढून नेण्याइतकी गेली आहे. चोरी होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे सापडले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या प्रकरणी पुजारी अरविंद वसंत गुरव यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र केवळ तपासाचे औपचारिक सोपस्कार नकोत, तर चोरट्यांचा तात्काळ छडा लावावा, देवस्थान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button