भोगावती कारखान्यासमोरील केडीसीसी बँक शाखेला मध्यरात्री आग; सुमारे २० लाखांचे नुकसान

भोगावती कारखान्यासमोरील केडीसीसी बँक शाखेला मध्यरात्री आग; सुमारे २० लाखांचे नुकसान
सिंहवाणी ब्युरो / राधानगरी
भोगावती साखर कारखान्यासमोरील केडीसीसी बँक शाखेला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संगणक, काउंटर, इलेक्ट्रिकल साहित्य, खुर्च्या तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बँक शाखेतून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्याने भोगावती साखर कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत शाखेतील अंतर्गत साहित्य मोठ्या प्रमाणात आगीत भस्मसात झाले होते.
या आगीत बँकेचे काउंटर, संगणक प्रणाली, विद्युत साहित्य व कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने बँकेतील रोख रक्कम व दागिने सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून आगीचे नेमके कारण व नुकसानाची अंतिम आकडेवारी तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बँक व्यवहारांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.