गारगोटी सोनाळी परिसरात चोरांचा मुक्त संचार नागरिकात भीतीचे वातावरण : अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत चोरटे कैद कारवाईची मागणी

गारगोटी सोनाळी परिसरात चोरांचा मुक्त संचार नागरिकात भीतीचे वातावरण :
अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत चोरटे कैद कारवाईची मागणी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
पावसाचा जोर कमी झाल्यापासून गारगोटी सोनाळी परिसरात चोरांचा मुक्त संचार सुरू झाल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनाळी भागात अनेक ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याचे सांगितले जात असून याबाबत भुदरगड पोलिसांशी नागरिकांनी संपर्क साधला आहे. या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. हे चोरटे काही ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचेही दिसून येत आहे.
याबाबत सोनाळी गाव भागातून मिळालेली माहिती अशी की सोनाळीतील सावंत गल्ली व आमदार गल्ली यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसात दोन तीन वेळेला चोरट्यांची चाहूल लागली. चोरीचे प्रयत्न झाले असल्याचेही या परिसरातील रहिवासी सांगतात. लोकांना जाग आल्यानंतर ते पळून गेल्याचेही काहींनी सांगितले.
हे चोरटे रात्री साडेदहा साडेअकराच्या दरम्यान तसेच पहाटे पाच च्या दरम्यान फिरत असल्याचे काहींनी सांगितले.
सोनाळी येथील यशवंत नर्सरीत काल पहाटे पाच च्या सुमारास एक महाविद्यालयीन तरुण वाटावा असा चोरटा नर्सरीचे गेट आणि कुलूप तोडून आत शिरला. बॅटरीचा उजेडात बराच वेळ पाहणी केली कुठे काही आहे का? काही किमती वस्तू मिळते का? हे तपासल्यानंतर तो सव्वा पाच च्या सुमारास नर्सरीतून बाहेर पडला. ही घटना नर्सरीचे मालक प्रसाद आबिटकर यांनी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली असून त्यांनी भुदरगड पोलिसांना याची माहिती दिली आहे. सिंहवाणीने या चोराचे फुटेज मिळवले असून या बातमीत ते देत आहोत.
हे चोरटे किती आहेत? त्यांच्याकडे हत्यारे आहेत का? याबाबत लोकांच्या संभ्रम आहे. पहाटे फिरायला जाणारे, महिला, वृद्ध मंडळी यांना धास्ती वाटत असून याबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. चोरट्यांची नेहमीची वेळ मध्यरात्री ते पहाटे तीन पर्यंत असते, मात्र हे चोरटे 10 नंतर व पहाटे पाच नंतर वावरताना दिसत असल्याने लोकांच्या आश्चर्य व घबराट व्यक्त होत आहे,