केवळ महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होत आहेत? : सतेज पाटील : तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार,

केवळ महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होत आहेत? : सतेज पाटील :
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार,
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला लगावला.
राज्यसभेच्या खासदारांना बोलताना थोडं तारतम्या बाळगायला हवं. यांचं ऐकून जर कोल्हापूरकर मतदान करत असतील तर त्यांचा दोन लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता, अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पलटवार केला. खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील, असा दावा केला होता. सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूरची निवडणूक कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशीच लढाई आहे. महायुतीच्या गेल्या तीन वर्षाचा कारभाराचा पंचनामा करत त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी छापून आलेल्या बातम्यांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून शहराच्या झालेल्या दुरावस्थेवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कोल्हापूरकरांना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे निवडणूक कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती अशाच प्रकारे आहे. मी काही भविष्यवाणी करणार नाही. मात्र कोल्हापूरकर आम्हाला स्पष्ट बहुमत देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आम्ही सुद्धा केलेल्या कामांची यादी लोकांसमोर ठेवणार
आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना आम्ही सुद्धा केलेल्या कामांची यादी लोकांसमोर ठेवणार आहोत. मात्र, गेल्या तीन वर्षापासून महायुतीची सत्ता होती. त्यांनी जो काही कारभार केला आहे त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, असेही पाटील म्हणाले. आमची महापालिका मध्ये सत्ता होती त्यावेळी हसन मुश्रीफ सोबत होते. राष्ट्रवादीचा महापौर दोन वर्ष होता. परिवहन सभापतीपद त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांच्यावर बोलता येत नसल्याने ते माझ्यावर टीका करत असावेत असा टोला त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगावला. धनंजय महाडिक यांना भूतकाळात घेऊन जायचं असल्याचे त्यांनी सांगत ताराराणीच्या आघाडीतून आपण महापालिकेच्या सत्तेत होतो असं त्यांनी म्हटलं. आम्ही टॅगलाईनच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने बोलत आहोत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने ते आमच्यावर बोलत असल्याची टीका त्यांनी केली.
केवळ महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होत आहेत?
प्रशासकांवर सरकारचा कंट्रोल होता. पालकमंत्री म्हणतात प्रशासकांवर आमचा कंट्रोल आहे, तर मग गेल्या तीन वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये झालेल्या बोगस कामाची जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे असं पाटील म्हणाले. कोल्हापूरमध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार बिनविरोध पायंड्यावरून त्यांनी टीका केली. ते म्हणाले की केवळ महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होत आहेत? निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप पद्धतीने वापर केला आहे. निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली.