कोल्हापूरच्या प्रेमीयुगुलाचा करुण अंत, राधानगरीच्या जंगलात मृतदेह सापडले : लग्नाच्या सप्तपदीऐवजी गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं,

कोल्हापूरच्या प्रेमीयुगुलाचा करुण अंत, राधानगरीच्या जंगलात मृतदेह सापडले
लग्नाच्या सप्तपदीऐवजी गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं,
सिंहवाणी ब्युरो / राधानगरी :
शेळेवाडी ता. राधानगरी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) आणि एका अल्पवयीन मुलीने (वय वर्षे १७) तरसंबळे (ता. राधानगरी) यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर जंगलामध्ये जाऊन ओंकार बरगे आणि अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याची माहिती तरसंबळेचे पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांन दिली आहे. या घटनेमुळे राधानगरी तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्येची ही घटना चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार ऊर्फ उदय बरगे व अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने तरसंबळे येथील हद्दीतील जंगल परिसरामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना एका शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्याने याची माहिती पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा तपास सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे घटनास्थळीच दोन्ही मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकार याच्या पश्चात आई, वडील. लहान भाऊ असा परिवार आहे.
या घटनेनं परिसरात हळहळ…
टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलेला ओंकार हा अतिशय कष्टाळू व मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सुरू आहे. गावातील यात्रेला देवालयाच्या प्रांगणात असणारी शंभर किलोची गुंडी उचलून तो दोन तीन फेऱ्या मारत होता. त्याने असा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर यामागचं कारण काय आहे? याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी होत आहे. प्रेमप्रकरणातून जंगलात केली आत्महत्या..
प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या नैराश्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूरच्या तरसंबळे येथील जंगल हद्दीत एका तरुणाने आणि एका अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय 28) आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हे एकाच दोरीने एकत्र बांधले गेले होते. यामुळे राधानगरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, ही दुर्दैवी घटना किमान चार दिवसांपूर्वी घडली होती. राधानगरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.