जिल्हाताज्या घडामोडी

कर्मवीर हिरे महाविद्यालयात अँटी रॅगिंग जनजागृती अभियानांतर्गत पोस्टर सादरीकरण

कर्मवीर हिरे महाविद्यालयात

अँटी रॅगिंग जनजागृती अभियानांतर्गत पोस्टर सादरीकरण

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी येथे इंग्रजी विभाग व अँटी रॅगिंग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता अँटी रॅगिंग जनजागृती अभियानांतर्गत पोस्टर सादरीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. उदय कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी रॅगिंग हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम करणारा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी परस्पर सन्मान, शिस्त व मैत्री जपून महाविद्यालयीन वातावरण सकारात्मक ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमात विविध शाखांतील व वर्गांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्समध्ये “रॅगिंगला नाही म्हणा”, “रॅगिंगमुक्त महाविद्यालय – सुरक्षित भविष्य”, “मैत्री वाढवा, रॅगिंग टाळा” अशा प्रभावी संदेशांद्वारे रॅगिंगविरोधी जनजागृती करण्यात आली. पोस्टर्सद्वारे रॅगिंगविरोधी कायदे, त्याचे दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. चंद्रकांत चव्हाण यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप अँटी रॅगिंग कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. मृणाल देसाई  यांच्या भाषणाने झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या रॅगिंगविरोधात निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात दिपाली सलते, सलोनी पाटील, हर्षदा कोटकर, प्रणाली फगरे, सुप्रिया येलकर या विद्यार्थिनींनी पोस्टर सादरीकरण मध्ये यश मिळवले. याप्रसंगी उपप्राचार्य संजय देसाई, प्रा जोतीराम सोरटे, प्रा ज्योती जाधव, प्रा ज्योती सातवेकर उपस्थित होते प्रा चेतन भगत  यांनी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पडून महाविद्यालयात सुरक्षित, सुसंस्कृत व रॅगिंगमुक्त वातावरण निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button