पुरस्कार ही व्यक्तीची सामाजिक उंची वाढवते: डॉ. डी. आर. मोरे शिवराज विद्या संकुलात शिक्षक सत्कार

पुरस्कार ही व्यक्तीची सामाजिक उंची वाढवते: डॉ. डी. आर. मोरे
शिवराज विद्या संकुलात शिक्षक सत्कार
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
सध्याच्या युगात चांगल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त होणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच कार्याला प्रेरणा मिळते. सामाजिक भावनेतून कार्य करण्याची उर्जा माणसांना प्राप्त होते. अशा समाज भावनेने केलेल्या कार्याला मानसन्मान व पुरस्कार प्राप्त होत असतात. पुरस्काराने व्यक्तीची सामाजिक उंची वाढवते. असे प्रतिपादन शिवाजी विदयापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे यांनी केले.
येथील शिवराज शैक्षणिक संकुलात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्यू कॉलेज कोल्हापूरचे माजी प्राचार्य डॉ. सी. आर. गोडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मीनलबेन मेहता पाचगणी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई, सेवानिवृत्त प्रबंधक बी. एस. मोहिते यांची उपस्थिती होती. सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. मोरे म्हणाले, बी. बी. ए., बी. सी. ए. सारखे अभ्यासक्रम सुरू करून शिवराज विद्या संकुलाने गडहिंग्लज उपविभागातील विद्यार्थ्यांची सोय करून शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवला आहे. शिवराज महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात विशेष नावलौकिक निर्माण केला आहे. शिवराजने माजी विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष प्रयत्न केले हे निश्चितच दिशादर्शक आहे. शिवराज विद्या संकुलाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कणा मजबूत करण्याचे कार्य केले आहे. हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. किसनराव कुऱ्हाडे व अनिल कुऱ्हाडे यांनी खऱ्या अर्थाने शैक्षणिक कार्याचा वसा आणि वारसा जपला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळे देशात 1980 मध्ये आयटी तंत्रज्ञान विकसित झाले. त्याचाच परिपाक म्हणून आज आपण आयटी सारख्या आधुनिक प्रवाहात सामील होत आहोत. त्यावेळी त्यांनी घेतलेले योग्य ते निर्णय आजही खऱ्याअर्थी समाजाला फलदायी ठरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात गुरूवर्य डी. डी. आसगावकर शैक्षणिक ट्रस्टचा उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, मराठी समाजशास्त्र परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सेवानिवृत्त समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. व्ही. एन. गजेंद्रगडकर, आसगावकर ट्रस्ट चा उत्कृष्ट प्राचार्य एम.आर. हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय कुंभार, सहाय्यक शिक्षक पुरस्कार प्राप्त अस्मिता दीपक पाटील (व्यंकटराव हायस्कुल आजरा), शिक्षक महादेव शिवणगेकर (डुक्करवाडी, हायस्कुल), अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचा नवदुर्गा पुरस्कार व सृजन सांस्कृतिक व समाजप्रबोधन मंचचा आदर्श वाचक पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या रेखा पोतदार आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्राचार्य डॉ. सी. आर. गोडसे म्हणाले, चांगल्या कार्याची स्तुती केलीच पाहिजे. तरच त्यांच्या कार्याचे आत्मिक समाधान प्राप्त होते. हे समाधानच खऱ्या कार्याला पुढे घेऊन जाणारे आहे. संस्थेचे कार्य एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे,, एम.के.सुतार, नंदनवाडे गुरुजी, प्रा.विश्वजित कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा.शिवाजी होडगे, पत्रकार दत्ता देशपांडे, डॉ. प्रा. सुनील देसाई, राजेंद्र खोराटे यांच्यासह मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,” शिवराजचे माजी सेवानिवृत्त प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील, प्रा.गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केले .पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.रंगराव हेंडगे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, डॉ.महेश चौगुले, प्रा.विक्रम शिंदे, डॉ.राहुल मगदूम, प्रा.संतोष पाटील, डॉ.ए.जी.हारदारे यांनी केले.
*सिनेट वर संधी दिली त्यांनी विश्वासघात केला* !
*गडहिंग्लज उपविभागात कामगिरी केलेल्या शिवराज कॉलेजला गेल्या सिनेट निवडी च्या वेळेस संधी देवू शकलो नाही. एका महाभागाला संधी दिली मात्र त्यांनी विश्वासघात केला. हे जाणून भविष्यात शिवराज शैक्षणिक संकुलाच्या प्रतिनिधीला संधी दिली जाईल. त्यांचा सन्मान करण्यात येईल असे डॉ. मोरे यांनी सांगितले. त्याची ठळक चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू होती.*