युवतींच्या वशीकरणासाठी भुदरगड तालुक्यात अघोरी प्रकार : तीव्र संताप बाभळीच्या झाडाला लावले युवतींचे फोटो, दाभण, बिब्बे अन् लिंबूही..

-
युवतींच्या वशीकरणासाठी भुदरगड तालुक्यात अघोरी प्रकार : तीव्र संताप
बाभळीच्या झाडाला लावले युवतींचे फोटो, दाभण, बिब्बे अन् लिंबूही..

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी:
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे-महालवाडी दरम्यानच्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी अमावस्येच्या रात्री तीन ते चार प्रेमविरांनी बाभळीच्या झाडावर अघोरी जादूटोणा करून इच्छित तरुणीला वश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या परिसरात खळबळ उडाली आहे.
दहा एकराच्या या विस्तीर्ण माळरानावर केवळ एकच बाभळीचे झाड आहे. या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू आणि दाभणाने मारलेले आढळले, तसेच झाडावर काळ्या बाहुल्या अडकवलेल्या होत्या. त्यापैकी एका बाहुलीवर युवतीचा फोटो होता, तर एका युवतीच्या आई, वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यांवर लटकवलेले होते. हा अघोरी प्रकार गुरुवारी अमावस्येच्या मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महालवाडी येथील ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने पाच तारखेला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुराण माळावर ग्राउंड करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. विज्ञानाच्या युगात अशा अंधश्रद्धेच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भुदरगड तालुक्यात वारंवार अघोरी प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनांमागील अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे.
राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही, अशा घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. जुलै 2023 मध्ये रेटवडी (ता. खेड) येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेतून तंत्रमंत्रासाठी अघोरी कृत्य केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे समाजात अंधश्रद्धेविरुद्ध जागरूकता वाढवणे आणि कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे.
…………………
युवतींच्या ड्रेसची बटणेही...
काळ्या बाहुल्या बरोबरच युवतींचे फोटोही झाडाला बांधले असून दाभणामध्ये युवतींच्या ड्रेसची बटनेही काळ्या दो-यामध्ये अडकली असुन या अघोरी प्रकारामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.