जिल्हाताज्या घडामोडी

भुदरगड तालुक्यात प्लॅस्टिक बंदीवर अनोखा उपक्रम फणसवाडी ग्रामपंचायतीची वेगळीच शक्कल

भुदरगड तालुक्यात प्लॅस्टिक बंदीवर अनोखा उपक्रम


फणसवाडी ग्रामपंचायतीची वेगळीच शक्कल


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी;
प्लॅस्टिक बंदी असतानाही लोकांना प्लॅस्टिकचा वापर सुरूच आहे.हा घनकचरा रस्त्यावर इतस्ततः विखुरलेला असतो.हा कचरा एकत्र गोळा करण्यासाठी फणसवाडी ता.भुदरगड या ग्रामपंचायतीने वेगळीच शक्कल लढवली आहे.घरात जमा होणाऱ्या प्लॅस्टिकची खरेदी सुरू केली आहे.हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.याबद्दल सरपंच बाळासाहेब जाधव यांचे कौतुक होत आहे.
भारतात प्लॅस्टिकचा वापर बेसुमार वाढल्याने कचऱ्याचे वाढते ढीग हे प्रत्येक गाव आणि शहरासाठी डोकेदुखी झाली आहे.पिण्याच्या बॉटल,प्लॅस्टिकची पिशवी,औषधांच्या आणि दारूच्या बाटल्या यांचा खच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसत आहे.हा कचरा पावसाळ्यात नाल्यातून नदीच्या पाण्यात जात आहे.तेथून तो समुद्रात वाहून जातो.समुद्र आपल्या पोटात काहीही ठेवत नसल्याने तो कचरा ढकलून काठावर लावत असतो.एक प्लॅस्टिकची पिशवी पूर्ण नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो.
गावातील प्रत्येक घराच्या परिसरात व रस्त्यावर अनेक प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक बॉटल इतरत्र पडलेल्या असतात. या विषयावर या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.यामध्ये प्लॅस्टिकमुक्ती बाबत सविस्तर चर्चा होऊन एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन ग्रामपंचायत कडून प्लॅस्टिक खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.या केंद्रामध्ये नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिक कचरा १० रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात येणार आहे.गावातील नागरिक आपल्या परिसरात प्लॅस्टिक कचरा न टाकता तो ग्रामपंचायतीच्या विक्री केंद्रात आणून विक्री करतील.जेणे करून प्लॅस्टिक कचरा गावामधून कमी होईल यासाठी सर्वांनी या विक्री केंद्राचा उपयोग करावा असे आवाहन सरपंच बाळासाहेब जाधव यांनी केले. प्लॅस्टिक बंदीवर एक नवा आदर्श निर्माण केला आहे

कडक निर्बंध
महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांकडून बाजारपेठा,हॉटेल्स,दुकाने आणि मॉल्समध्ये धाडी टाकून विनापरवाना प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. पहिल्यांदा पकडले गेल्यास ५००० दंड, दुसऱ्यांदा १०००० आणि तिसऱ्यांदा २५००० दंड होऊ शकतो.याशिवाय कारागृहाची शिक्षा होऊ शकते.
प्लॅस्टिक प्रकारानुसार विघटन कालावधी:

प्लॅस्टिक पिशव्या १० ते १००० वर्षे
प्लॅस्टिक बाटल्या ४५० वर्षे किंवा अधिक
प्लॅस्टिक स्ट्रॉ सुमारे २०० वर्षे
प्लॅस्टिक कप ५० वर्षे
प्लॅस्टिक मास्क आणि ग्लोव्हज १०० ते ५०० वर्षे

याबाबत बाळासाहेब जाधव म्हणाले,प्लास्टिकचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही.त्यामुळे ते सूक्ष्म स्वरूपात तुकडे होऊन पर्यावरणात टिकून राहतात.यामुळे माती,जलस्रोत खराब होतात आणि नैसर्गिक अन्नसाखळीला हानी पोहोचते.त्यामुळे प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आणि पुनर्वापरावर भर देणे गरजेचे आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक वापरावर शासनाने कडक निर्बंध घातले आहेत.पण पर्याय नसल्याने त्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्याचे संकलन करण्यासाठी हा नवीन प्रयोग सुरू केला आहे.या गावातील नागरिक सुज्ञ आणि वैचारिक बैठक असल्याने सगळे ग्रामस्थ जबाबदारीने हे अभियान यशस्वी करून दाखवतील.

सरपंच बाळासाहेब जाधव
गावातील प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी ग्रामस्थांना पर्यायी व्यवस्था देणे गरजेचे होते.केवळ प्लास्टिक वापरू नका असे सांगून त्याचे पालन होत नाही.म्हणून प्लास्टिक खरेदी करून संकलित करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून कचरा संकलनाला सुरूवात झाली आहे.जमा होणारे प्लास्टिक पुनर्वापर करण्यासाठी प्लास्टिक व्यापाऱ्याला देण्यात येणार आहे.ना नफा ना तोटा या तत्वावर हे अभियान चालवण्यात येणार आहे.


सेवानिवृत्त सुभेदार
दत्तात्रय साळवी
लोकनियुक्त बाळासाहेब जाधव यांनी गावाच्या विकासासाठी ध्यास घेतला आहे.त्यांनी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. प्लास्टिक च्या संकलनाची ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करून दाखवली आहे.ही संकल्पना जिल्ह्याला पथदर्शी उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button