शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव योग्य,
नामविस्तार करा म्हणणाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू; ‘त्या’
खासदार – आमदारांचा केला निषेध
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा, असे सांगणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही. त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या बैठकीत देण्यात आला. ‘शिवाजी विद्यापीठ’ हे नाव अत्यंत विचारपूर्वक देण्यात आले असून, ते बदलण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. तसे झाले तर कोल्हापूरकरांचा त्यास तीव्र विरोध असेल, असा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे बैठक झाली.
डॉ. भालबा विभुते म्हणाले, ‘छत्रपती राजाराम महाराज यांनी १९३४ च्या राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात विद्यापीठाच्या स्थापनेचा विचार मांडला होता. त्याचे प्रारूप डॉ. बाळकृष्ण यांनी तयार केले.
शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत १० जुलै १९६२ ला कोल्हापुरातील विद्यापीठाची घोषणा केली. प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल समिती नियुक्त होऊन पन्हाळ्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. समितीच्या अहवालातील ६७ व्या परिच्छेदात शिवाजी विद्यापीठ हेच नाव असे म्हटले आहे.’
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘शिवाजी महाराज यांच्या देहावसनानंतर मराठ्यांनी सुमारे चाळीस वर्षे मोघलांविरुद्ध लढा दिला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच लोक मराठ्यांनी हल्ला केल्यावर ‘शिवाजी’ने हल्ला केला, असे म्हणायचे. त्या काळात तो परवलीचा शब्द झाला होता. इंग्रजांनी तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ या घोषणेवरच बंदी घातली होती. सरकारकडे शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावे, याबाबतचे निवेदन देण्यात यावे.’
हिंदी शिवचरित्रकार डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, ‘सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना शिवरायांच्या प्रेरणेतून केली होती. शिवाजी विद्यापीठ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे.’
इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनीही शिवाजी विद्यापीठाच्या
नामविस्ताराला तीव्र विरोध केला. डॉ. विलास पवार यांनी
नामविस्ताराची मागणी करणारे जेम्स लेन प्रकरणावेळी कोठे होते,
त्यांना आताच नामविस्ताराचा उमाळा का फुटला, असा सवाल
उपस्थित केला.
याप्रसंगी माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, निमंत्रक वसंतराव मुळीक व आर. के. पोवार, दिलीप पवार, बाबूराव कदम, सुरेश शिपूरकर, विजय देवणे, गणी आजरेकर, किसन कुराडे, भैया माने, चंद्रकांत यादव, बबन रानगे, दगडू भास्कर, अॅड. विवेक घाटगे, संभाजी जगदाळे, सरला पाटील, पद्मा तिवले, डी. यू. पवार, उदय नारकर, शैलजा भोसले, प्रा. जे. के. पवार, हर्षल सुर्वे, वसंतराव मगदूम, शुभम शिरहट्टी, अॅड. अभिषेक मिठारी उपस्थित होते.
खासदार, आमदारांचा निषेध
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा, अशी मागणी करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने यांचा बैठकीत निषेध करण्यात आला.