गारगोटीत रंगपंचमी दिवशी रंगाचा बेरंग: दोन दुःखद घटना : दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुण मृत्यूमुखी

गारगोटीत रंगपंचमी दिवशी रंगाचा बेरंग: दोन दुःखद घटना :
दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुण मृत्यूमुखी

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
रंगपंचमी सणाचा उत्साह गारगोटी शहरासह संपूर्ण भुदरगड तालुक्यात ओसंडून वाहत असतानाच गारगोटी शहरात घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांनी त्यास गालबोट लागले. दोन वेगवेगळ्या घटनात तरुण पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गारगोटीत दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत पाण्यात बुडून दोन युवकाना जलसमाधी मिळाली आहे. राहुल किरण कलकुटकी (३२ रा. शीवाजीनगर, गारगोटी), तानाजी भागोजी बाजारी (१८ रा. फये धनगरवाडा) अशी त्यांची आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
रंगपंचमी खेळून राहुल किरण कलकुटकी हा दुपारच्या सुमारास आपल्या मित्रा समवेत वेदगंगा नदीवरील दत्त घाटावर अंघोळीसाठी गेला होता. घाटावरील दगडावर बसून अंघोळ करत असताना पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याच्या तळाशी बुडालेला राहुल बाहेर आलाच नाही. मित्रांनी आरडाओरडा करुन वाचविण्यासाठी प्रयत्न केला. त्यास पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुलच्या मृत्युची वर्दी महेश कलकुटकी यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.
तानाजी भागोजी बजारी ( धनगरवाडा, फये) हा येथील आईसिआरई पाॅलीटेक्नीक मध्ये
विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकत होता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहत होता. चारच्या सुमारास तो या परिसरातील विहीरीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मित्रांने मस्करी करत त्यास विहिरीतील पाण्यात ढकलले मात्र त्यास पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शोध शोध करूनही त्याचा मृतदेह सापडला नव्हता योगेश कोळी याने पाण्यातून शोधून मृतदेह बाहेर काढला.