रंगपंचमीची नशा आणि चेष्टा अंगलट आली? हुशार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने हळहळ हुल्लडबाजीला अळा घालायला हवा

रंगपंचमीची नशा आणि चेष्टा अंगलट आली? हुशार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने हळहळ
हुल्लडबाजीला अळा घालायला हवा

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
रंगपंचमीच्या आनंदानंतर आंघोळीस गेलेल्या दोन तरुणांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडवून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रंगपंचमीच्या बदलत्या स्वरूपाबाबत आणि तरुणाईच्या चेष्टा मस्करीच्या अतिरेकाबाबत तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.
काल झालेल्या दोन घटनांपैकी डी वाय पाटील कॉलनी नजीकच्या विहिरीत बुडून मयत झालेला तानाजी भागोजी बाजरी याच्या फये या गावावर शोककळा पसरली होती. तानाजी मौनी विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकी द्वितीय वर्ष पदवीकेत शिकत होता. त्याच्या शिक्षकांनी सांगितले की तो अतिशय हुशार, अभ्यासू व प्रामाणिक विद्यार्थी होता. त्याने गेल्या सत्र परीक्षेत 90% मार्क मिळवले होते. दुर्गम डोंगराळ भागातील धनगर वाड्यासारख्या गावातील हा तरुण चांगला अभियंता झाला असता, पण नियतीच्या मनात ते नव्हते.
तानाजी रंगपंचमी नंतर कपडे धुण्यासाठी गेला होता. कुणीतरी त्यास मस्करीने पाण्यात ढकलले अशी चर्चा आहे. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा घात झाला.
आपला हाताशी आलेला मुलगा अचानक गेल्याने शोक संतप्त होऊन तानाजीचे वडील आणि नातेवाईक आक्रोश करत होते.
दगडावर बसून आंघोळ करणारा राहुल कलकुटकी पाण्यात पडला. त्यालाही पोहोचता येत नव्हते. त्याच्या मृत्यूने शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
आठरा विशीतलीही दोन तरूण मुलं अशा घटनेत निघून गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत असून झालेल्या अपघाताबाबत लोक चर्चा करीत आहेत.
रंगपंचमीचा शांत, सरळ, आनंददायी सण आता कुठे हरवला? असा सवाल करत एक वयोवृत्त म्हणाले, सणांच्या नावाखाली आज अक्षरशः हुल्लडबाजी चालली आहे. त्याच खतपाणीही घातले जात आहे. रंगपंचमी आहे म्हणून गारगोटी आठवडी बाजारचा दिवस बदलायचा.. हे गारगोटीच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे त्या वयोवृद्धांनी सांगितले. यावर कुठेतरी आळा बसायला हवा असे मत व्यक्त केले
चेष्टा मस्करी ही अलीकडील तरुणाईत प्रचंड बोकाळली आहे. हुल्लडबाजीला धरबंदच राहिलेला नाही. त्याची किंमत समाजाला कालच्या दोन घटनांनी मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागते आहे.
जाणकार मंडळीं, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था व पालक वर्गाने पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या हुल्लडबाजीला वेळीच आळा घालायला हवा, अन्यथा भविष्यात परिस्थिती खूपच हाताबाहेर जाणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.