पुस्तक परिक्षण
भ्रष्टाळलेल्या शिक्षण व्यवस्थेचं पोस्टमार्टम : बे दुणे शून्य
–रवींद्र शिवाजी गुरव,
नव्या दमाचे लेखक रवींद्र रेखा गुरव यांची बे दुणे शून्य ही पहिली वहिली कादंबरी दर्या प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहे. गौतम सारख्या प्रामाणिक शिक्षक नायकाला घेऊन लढणारी. हा नायक बरबटलेली ही व्यवस्था नितळकाच करणारी निवळी होऊन व्यवस्थेच्या विरोधात फिरत राहतो ते अखेरपर्यंत. न संपणारं त्याचं हे खेटं. या कादंबरीनं भ्रष्टाळलेल्या शिक्षण व्यवस्थेचं तळ ढवळून काढत
पोस्टमार्टमच केलं असून सकस कादंबरीकार म्हणून लेखकाची ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. राजन गवस यांची पाठ राखण मलपृष्ठावर कादंबरीचा भक्कम कणा होते ती कादंबरीच्या पोटातलं वाचकांच्याही ओठात आणत. मुखपृष्ठ तर चित्रकार सुधीर गुरव यांच्या कुंचल्यातून बाहेर पडत फळ्याचं टवकं उडालेलं बघत खडूसह वाचकाला अलगद कादंबरीच्या भरल्या वर्गात घेऊन जातं.
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय साळगाव ही यातील निमित्त मात्र औषधाला धनी अशी ही शाळा. ती समस्त शाळांचं रोजचं मडं घेऊन रडते. गौतमच्या रूपान अन्यायाविरुद्ध लढायला धजते. हैबती पाटील तात्या सारख्या देव माणसांन गोरगरिबांच्या मुलांसाठी उभी केलेली शाळा त्यांच्या जाण्यानंतर कारभार सांभाळणाऱ्या अध्यक्ष तानाजी पाटील या पोरामुळं गोरगरिबांची राहतच नाही. पैसे वसूल करणारी होते…’ना तोटा निव्वळ नफा ‘ या तत्त्वावर चालत राहते ती अगदी किराणा मालाच्या दुकानासारखी. ही शाळा निमित्त मात्र अशा शेकड्यान एका माळे च्या मणी आहेत… अशा दिगात समस्यांचे म्होरकेपण ही शाळा करते.
माध्यमिक शिक्षकाला
नोकरी लागल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत कसं पद्धतशीर लुटलं जातं त्याचं विदारक सत्यचित्र ही कादंबरी उभं करते. शिक्षणाचं गणितच बिघडलंय ‘बे दुणे चार ‘ उत्तर येईल याची खात्रीच देता येत नाही हे ठासून सांगते. अरेरावी करणारे अध्यक्ष, संचालक, व्यसनी मुख्याध्यापक, कानभरणी करणारी आगलावी कामचूकार पिलावळ यावर प्रकाश झोत टाकते. पोषण आहार सुद्धा मुलांना नीट दिला जात नाही तोही बेचव तसेच त्यातही भ्रष्टाचार रूजलाय हे दावते. तांदळाची पोती मुख्याध्यापकानं अध्यक्षाच्या घरात पाठवणं, जेवण शिजवणाऱ्या शेवंताच्या माध्यमातून कडधान्य
घरपोच होणं असा सगळा सावळा गोंधळच पुढं मांडते. शिक्षकाची नेमणूक बॅक डेटेड एप्रूव्हल, शिक्षण सेवक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी, फरकाची बिलं अशात अधिकारी पैसे उकळणं कसं सुरू ठेवतात आणि शिक्षण विभागातील अधिकारी तर यात कसे माजलेत हे उजेडात आणते. शिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग यांनी लुटीचं लायसनच मंजूर करून घेतलंय अशीच भयानक परिस्थिती आहे, असं बोलायलाही कुणाच्या बापाला भीत नाही.
विनाअनुदानित शिक्षकावर कैक वर्षे बिन पगारी आणि फुल अधिकारी असं वावरत पडेल ते काम करण्याची वेळ येते. पगार हाती आल्यावर संस्थाचालक दमदाटीनं पगार काढून घेऊन मोकळे होतात. प्रसंगी कोरा चेकही सहीनिशी घेऊन आधीच डाव साधतात. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या या कादंबरीतील गौतमची आई तर नातवंडांचं तोंड बघण्याची इच्छा व्यक्त करून दमते आणि तो मात्र पगार होईल या आशेवर आई, पत्नीची समजूत काढत राहतो. अशात जीवाला घोर लावून आई जाते. थोड्याफार फरकान हे दुखणं तर प्रत्येकाच्याच वाट्याला येणारं आणि जिव्हारी लागणारं. अशातून पगार सुरू झाल्यावर तर संस्थापक पगारालाच महिन्याला टक्केवारीची कात्री लावून तोंडचा घास हिसकावून घेतो. एखादा त्यांनी ठरवलेल्या संस्था हिताच्या गोंडस हुकूमशाही नियमांच्या विरोधात गेला तर त्याचा काटा काढला जातो. शाळा बांधाय काढ पैसे, निवडणूक आली काढ पैसे, व्याख्यान ठेवा काढ पैसे, निवडणुकीच्या प्रचाराला फिरा, गॅदरिंग ठेवा नारळ फोडाय तेवढे हे शिक्षण सम्राट …कशा कशाला पैसे काढायचे? हा प्रश्न छळत राहतो..गुलामगिरीचे हे शेकडो प्रकार कादंबरी उजेडात आणते.
संस्थापकाच्या पोराचं लगीन ठरलं काढ वर्गणी आणि वर राब दिवस-रात्र. यांच्या पगाराला अशा हजार वाटा…. त्यातून घर खर्च चालवायचा, कर्ज फेडायचं की या न घेतलेल्या देणेकर्यांचा तगादा चुकवायचा….?
गावात मंदिर बांधायला लागलं तरीही वर्गणीला शिक्षकच…. बळीचा बकराच करून टाकलाय….अजून कहर म्हणजे पैसे कमी पडले म्हणून शाळाच विकून टाकण्याचं षडयंत्र तडीस न्हेलं जातं… या विरोधात कुणी आवाज उठवेल त्याची बदली, मेमो, अतिरिक्त आणि प्रसंगी नोकरीतून काढून टाकण्याची धमकी ते बदनामीचे किटाळही. ‘शाळा म्हणजे कोंडवाडा, मास्तर म्हणजे खुळा रेडा……’ असंच सगळं मनमानी. एखादा दारुडा शिक्षक आपल्या बदली दुसरा शिक्षक नेमतो हेही भयानक अंग दावत उतारा, अंधश्रद्धा यावरही प्रहार करते. वेदनादायी सगळं तरीही गमतुळा यशवंत यावर एखादी फुंकर घालतो ते आपल्या बोलण्यातून आणि वेदना निवळून टाकत राहतो…
१५ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन गाठून शाळेत उगवणारा अध्यक्ष इतरवेळी शाळा हाय का नाही हेही बघायला येत नाही. वर अमोशा पौर्णिमेला येऊन आडवं तिडवं भाषण ठोकून जातो ते ऐकणाऱ्यांना चीड आणतच.
पायतान मारल्यासारखा, तत फफ, पुढारीण, रोपा लावाय, गव्याचं शात, ओपाडं, टवकं गेलेला कप, च्या, चिकोल, इरलं, वघळ, काचोळा, फितिवलय, वायदा, पेंढीला, मागास भात, वाढयाला, शात लावून टाकूया, इंगा, बिंडा, साळोता, कुभांड, इदरकल्याणी, हाराखली, जिबली, टारगट असे शब्द सौंदर्य कोल्हापुरी भाषेतून मिरवत म्हणी वाक्प्रचारातून धाडसान थेट तोंडाव बोलून गाभण करत अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषेत ‘तू काय शाहू महाराज लागून गेलास व्हय’ म्हणत माझ्या हेच्याव मारी, उंडग मल्लं, आंडबिल्या ठेचाय पाहिजे असं न केंडता कली बिघाडली म्हणत कचकून शिव्या हासडते.
‘डोंगर कपारीला झोपलं दोघं गोरंपान,
लोंडोबा, बसुदेव दोघं राखत गायरान…..’
अशा ओव्याही गाते.
कादंबरीनं लेखकाच्या दमदार लेखणीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या शिक्षकांच्या अपप्रवृत्तींवरही घणाघात घातला आहे तो ही त्यांची बाजू न घेता. शाळेला मुतारी बांधून देणारा, पदोपदी मदत करणारा एखादा शिक्षक असू शकतो अशी उदाहरणं देत चांगले शिक्षक आणि शाळांवर अन्याय होतोय म्हणून त्यांची बाजूही उचलून धरली आहे. चांगल्या चा उदो उदो करत वाईटाला पायाखाली तुडवला आहे.
शिक्षक पतसंस्था, तिथला भ्रष्ट कारभार आणि तिच्या विरोधात लढणारा प्रामाणिक शिक्षक ही ठासून पेरला आहे. दारू, मटण आणि पाकीट संस्कृतीला भूलणारी सोडून काही प्रामाणिक तग धरून राहणारी शिक्षक मंडळी ही इथेच भेटवते. स्कॉलरशिप परीक्षेतील घोटाळा सांगत शिसारी आणते.
शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, विनाअनुदानित कृती समितीचे भीक मागो आंदोलन, गरिबीला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या अशा बातम्या डोकं सुन्न करतात …..
शिक्षण व्यवस्थेच्या या खदुळऱ्यांद बजबजपुरीत गौतमचं खेटं मात्र निवळी होऊन सुरूच राहतात ते वेगवेगळ्या शिक्षकाच्या रूपानं अन्यायाविरुद्ध स्वतःला उभं ठाकत…लढत…. अशा उपद्रवी समाजसेवेचा टेंभा मिरवणाऱ्या स्वतःचं चुंबडं भरणाऱ्या शाळा कुत्र्याच्या छत्रीगत मुलखातून उगवल्या आहेत… दुकानच थाटलंय त्यांनी किराणा मालाला मागं टाकल असं. कैक जण त्याची गिर्हाईक…गौतम त्यातील एक उदाहरण…. ही व्यवस्था जिकडं – तिकडं पांगली आहे. अशा लाखो शाळा ….. यात अपवादानच एखादी तोटा सोसून मुलांसाठी झटणारी वेगळी असेल. मात्र सर्रास शिक्षण संस्था भ्रष्टाचार आणि राजकारणाचा अड्डा झाल्या आहेत. शिक्षण नाही तर भक्षण संस्थाच झाल्या आहेत, असं ती पोटतिडकिनं म्हणते….
अशा गदाळलेल्या शाळा नितळ काच करण्यासाठी गौतम सारखा एखादा शिक्षक निवळी होऊन वनाना हिंडतो. एका शाळेतून बदली होऊनही मुलांचा जिव्हाळा ती थांबवते. पुन्हा त्याला अतिरिक्त ठरवलं जातं ते कट कारस्थानानं. इतकच नाही तर त्याला दुसऱ्या शाळेतही हजर न करून घेण्याचा डाव आखला जातो. मात्र तो अतिरिक्त ठरलेला लढा आपल्यासारख्याच समस्याग्रस्त शिक्षक साथीदारांसमवेत लढत शाळेत हजर व्हायला निघतो ते हुकूमशाही ‘हम करे सो कायदा’ म्हणणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात खेटं घालतच… तो हजर करून घेण्याच्या शाळेच्या दिशेन निघालाय… हिंडतोय गारगार मात्र त्यालाच गाडाय, विकाय…ही व्यवस्था टपून बसली आहे…. दुःखांत पदरी पाडून घेत….. आपल्या या प्रामाणिक लढ्यात एक एखादा सामील होईल म्हणून….कदाचित उद्याचा दिवस आपला असेल म्हणून ही व्यवस्था आज ना उद्या नेटान उलथी पालथी करावी म्हणून त्याला बारा हत्तींचं बळ देत त्याच्यासंगं झटते….. झटंझोंबं खाते.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाची ही हकीकत मांडणाऱ्या, अन्याय विरुद्ध लढणाऱ्या या खेट्यांसाठी… प्रामाणिक शिक्षकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गौतमला पुढची वाट नेटानं तुडवण्यासाठी
आणि सकस बीज घेऊन पेरत निघालेल्या पेरक्या लेखकाला वाढदिवस गाठून आभाळभर शुभेच्छा….
*कादंबरी – बे दुणे शून्य*
*लेखक- रवींद्र रेखा गुरव.*
*प्रकाशक – दर्या प्रकाशन, पुणे.*
*पृष्ठे- २५०.*
*किंमत- ३२५₹.*