शिवाजी विद्यापीठ नामविस्तार: बाहेरच्या राज्यातील व्यक्ती येऊन पेटवण्याची भाषा करतील, तर स्वाभिमानी कोल्हापूरकर कोल्हापुरी हाती घेतील

शिवाजी विद्यापीठ नामविस्तार:
बाहेरच्या राज्यातील व्यक्ती येऊन पेटवण्याची भाषा करतील,
तर स्वाभिमानी कोल्हापूरकर कोल्हापुरी पायताण हाती घेतील
सिंहवाणी ब्युरो/ कोल्हापूर
: बाहेरच्या राज्यातील व्यक्ती येऊन कोल्हापूर पेटवण्याची भाषा करीत असेल, तर स्वाभिमानी कोल्हापूरकर ते कदापि सहन करणार नाहीत, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराविरोधात कोल्हापुरी पायताण घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्धार इंडिया आघाडी, सामाजिक संघटना, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी संघटना व शिवप्रेमींच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून दि. 26 मार्च रोजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सामूहिकरीत्या ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ या घोषणेचा जयघोष करण्यात येणार आहे. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन दिले जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी व शिवप्रेमींची शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे अध्यक्षस्थानी होते. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा नामविस्ताराचा प्रश्न 62 वर्षांनंतर उपस्थित करण्यात मोठे षड्यंत्र आहे. राज्यकर्ते आता शिक्षण व शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करीत आहेत. प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले, चार पानांचे पत्रक काढून शिवाजी विद्यापीठाचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे. डी. यू. पवार म्हणाले, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अस्तित्वात आहे, हे सरकारच्या लक्षात आणून दिले पाहिजे. कायद्याने दोन विद्यापीठे अस्तित्वात असू शकत नाहीत. कायदेशीररीत्या नाव बदलणे अवघड आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. परराज्यातील आमदार कोल्हापुरात येऊन आम्हाला शहाणपण शिकवत असेल, तर त्याचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
अॅड. अभिषेक मिठारी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्ताव आणून आम्ही आमचे काम केले. हा चेंडू आता जनतेच्या कोर्टात आहे. विद्यार्थी, पदवीधर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षण संस्था, पेठा-पेठांमधील तालमींचे निवेदन राज्यपाल, सरकारपर्यंत गेले पाहिजे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, पहिल्यांदा घरचे लोक व आसपासच्या नागरिकांना शिवाजी विद्यापीठ नाव का असले पाहिजे, याबद्दलची भूमिका पटवून दिली पाहिजे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुरातील आजी-माजी सिनेट सदस्य, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आदी पेठांमधील तालीम मंडळांच्या बैठका घेऊ. त्यांची निवेदने सरकारला व कुलगुरूंना पाठवावीत. प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे म्हणाले. दर पाच-दहा वर्षांनी विद्यापीठ नामविस्ताराचा मुद्दा पुढे येत आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा इतिहास घराघरांत पोहोचवला पाहिजे. पुढील आठवड्यातील शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद बैठकीत शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहिले पाहिजे, असा ठराव मांडणार आहे. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन जोडून घेतले पाहिजे. त्यांच्यापर्यंत शिवाजी विद्यापीठाचा इतिहास गेला पाहिजे. वसंतराव मुळीक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोल्हापूरकर खपवून घेणार नाहीत. सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांनी एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. सरलाताई पाटील, डॉ. अनिल माने, रवी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात विजय देवणे म्हणाले, विद्यापीठाच्या सिनेटमध्ये नामांतरविरोधी स्थगन प्रस्ताव स्वीकारणे हाच पहिला विजय आहे. आता विद्यापीठाचे नामांतर का नको, हे लोकांना, विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृती आराखडा आखला आहे. सरकारने आमची मागणी ऐकली नाही, तर मुंबईत धडक मोर्चा नेऊ; परंतु विद्यापीठाचे नामांतर होऊ देणार नाही. यावेळी याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अॅड. महादेवराव आडगुळे, शेकापचे बाबुराव कदम, भारती पोवार, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, डी. जी. भास्कर, आम आदमी पक्षाचे उत्तम पाटील, रमेश पवार आदी उपस्थित होते.