सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा कोल्हापूरमध्ये मोठा प्रताप, शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची केली वाहतूक : 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा कोल्हापूरमध्ये मोठा प्रताप,
शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची केली
वाहतूक : 25 लाखाचा मुद्देमाल जप्त
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश घालून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमधून समोर आला आहे. याप्रकरणी तोतया कर्मचाऱ्यास उत्पादन शुल्क विभागाने दारू साठ्यासह पकडले आहे. गाडीवर शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची वाहतूक केली जात असताना उत्पादन शुल्क विभागाने रंगेहाथ पकडलं आहे. याप्रकरणी तोतया नितीन ढेरे आणि निवृत्त लष्करी जवान शिवाजी धायगुडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून 2 लाख 51 हजारांची दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी यांच्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करणाऱ्या चालकानेच दारू तस्करीचा धंदा सुरू केला होता. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश परिधान करत लालबत्ती लावून त्याने ही तस्करी सुरू केली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये हा ड्रायव्हर रंगेहाथ सापडला आहे. गडहिंग्लज नेसरी रोडवर रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन ढेरे असं या चालकाचं नाव आहे. तसंच त्याच्याबरोबर निवृत्त लष्करी जवानही दारू तस्करी करताना सापडला आहे. अधिकाऱ्याच्या गाडीवर असलेल्या या ड्रायव्हरने नेमके एवढे धाडस केले कसे? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.