*५ खासदार, १० आमदार यांनी राजेवाडी प्रश्नी दिले समर्थन !* *राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडीवर पुन्हा होवू घातलेला अन्याय रोखा !* *सादिक खाटीक यांचे साकडे

*५ खासदार, १० आमदार यांनी राजेवाडी प्रश्नी दिले समर्थन !*
*राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडीवर पुन्हा होवू घातलेला अन्याय रोखा !*
*सादिक खाटीक यांचे साकडे
सिंहवाणी ब्युरो?आटपाडी
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, नव्या अन्यायी प्रस्तावाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यावर पुन्हा होवू पाहणारा अन्याय तातडीने रोखून आटपाडी तालुक्याच्या मागणीलाच शासनकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी न्याय मिळवून द्यावा . असे आवाहन आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार, शेतकरी साहित्य इर्जिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या राजेवाडी गावातल्या *म्हसवड तलावाचे* फलटणचे विभागीय कार्यालय सातारा येथे, पंढरपूरचे उपविभागीय कार्यालय गोंदावले येथे तर महुद येथील पुर्वीच्या शाखा कार्यालया बरोबरच आणखी एक शाखा कार्यालय म्हसवड येथे सुरु करण्याचा नवा प्रस्ताव सातारा जिल्ह्यातील एका नेत्याच्या आग्रहावरून अधिकारी यांनी राज्य शासनाकडे पाठविल्याचे समजले आहे. या कथीत प्रस्तावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्यावर पुन्हा मोठा अन्याय होवू शकतो.
*राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे फलटणचे विभागीय कार्यालय सांगली जिल्हा जलसंपदा कडे वर्ग व्हावे . पंढरपूरचे उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे सुरु करावे . आणि महुद येथील शाखा कार्यालय तलावाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे राजेवाडी येथे व्हावे . राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे, १४० वर्षानंतर तरी नामकरण राजेवाडी तलाव असे केले जावे . ही आटपाडी तालुक्याच्या हिताला मोठा न्याय देणारी महत्वाची मागणी आहे . या हृष्टीने आपण सातत्याने सरकारचे लक्ष वेधल्याचे सादिक खाटीक यांनी प्रारंभीच स्पष्ट केले .*
आटपाडी तालुका वाशीयांच्या हिताच्या मागणीला वास्तवात येऊ न देण्याच्या उद्देशानेच सदरचा नवा प्रस्ताव केल्याचे आणि हाच प्रस्ताव सत्यात आणण्यासाठी, हे सातारा जिल्हा वाशीय नेते प्रयत्नरत असल्याची चर्चा आहे .
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्याच्या हिताच्या मागण्या संदर्भात, राज्यातील ५ खासदार, १० आमदार महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहली आहेत . त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आदरणीय खासदार सौ . सुप्रियाताई सुळे, खानापूरचे आ . सुहासभैय्या बाबर , आ . गोपीचंद पडळकर जत , माजी मंत्री, आ . सुरेशभाऊ खाडे मिरज , आ . इद्रिसभाई नायकवडी मिरज, आ . रोहितदादा सुमन आर. आर . आबा पाटील तासगांव – कवठेमहंकाळ , माजी मंत्री, आ . विश्वजीत कदम पलुस – कडेगांव, खासदार विशालदादा पाटील सांगली, खा . अमोल कोल्हे शिरूर, खा . अमर काळे वर्धा, माजी मंत्री, खा . फौजिया खान परभणी, आमदार उत्तमराव जानकर माळशिरस , आ . बापूसाहेब पठारे वडगांव शेरी पुणे, आ. जयंत आसगांवकर कोल्हापूर, आ . अभिजित पाटील माढा, या लोकप्रतिनिधींच्या सह , पाणी संघर्ष समितीचे प्रणेते डॉ . भारत पाटणकर कासेगांव, एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे मुख्य संपादक, आटपाडीचे सुपुत्र राजीव खांडेकर मुंबई या मान्यवरांचा समावेश आहे . याशिवाय राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडीच्या मागण्यां समर्थनार्थ राज्यातील अन्य काही लोकप्रतिनिधींनीही राज्य शासनाचे लक्ष वेधल्याचे समजते . राजेवाडी गावच्या ग्रामपंचायतीने या मागण्यांसाठी मासीक सभेत, ग्रामसभेत केलेल्या ठरावांच्या प्रती शासनाला पाठविल्या आहेत .
सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहराच्या वायव्य दिशेला ३० किमी अंतरावर राजेवाडी गावालगत ३ टीएमसी इतक्या क्षमतेचा भला मोठा तलाव आहे . तर आटपाडी शहराच्या आग्नेय दिशेला ३० किमी अंतरावर बुद्धीहाळ तलाव हा ही एक भला मोठा तलाव आहे . साधारणतः १८७६ ते १८७९ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या म्हसवड ( राजेवाडी ) तलावाचे पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यात, तलावाचा मुख्य भरावा, पाण्याचा काही भाग, तलावापुढील कॅनॉल वाहून जाणारा १५ किमी पर्यतचा भाग सांगली जिल्ह्यात . आणि या तलावाचे बहुतांश पाणी जात होते सोलापूर जिल्ह्याला अशी या तलावाची पुर्वांपार स्थिती आहे . या तलावात सध्या प्रचंड गाळ साठल्याने याच्या पाणी क्षमतेवर मोठा प्रतिकुल परिणाम झालेला आहे . जवळ जवळ दीड टीएमसी पाण्याच्या क्षमतेची जागा गाळाने व्यापली आहे . या तलावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्याचे दुर्देव असे की, गत १४० वर्षा पासून आटपाडी तालुक्यावरच, या तलावाच्या माध्यमातून मोठा अन्याय झाल्याचे सर्वांच्या लक्षात येईल. राजेवाडी तलावाचे पाणी आटपाडी तालुक्याला दिले जावे म्हणून या तलावाच्या सांडव्याची काही दशकापूर्वी १९६३ च्या दरम्यान एक फुटाने उंची वाढविली गेली . तरीही संपूर्ण आटपाडी तालुका राजेवाडीच्या पाण्यापासुन वंचितच ठेवला गेला. आटपाडी तालुक्याकडे जाणाऱ्या नव्या कॅनॉल निर्मितीचा फार्सही सुमारे ४० वर्षापूर्वी केला गेला होता . तथापि राजेवाडी तलावाचे पाणी संपूर्ण आटपाडी तालुक्याला दिले गेले नाही . हे जळजळीत वास्तव आहे .
१८८० ते १९३२ पर्यत म्हणजे जवळ जवळ ५२ वर्षे राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाने पंढरपूर शहराला पिण्याचे पाणी पुरविले आहे . पंढरपूरच्या पदमावती तलावात जाणारे राजेवाडीचे हे पाणी गोपाळपूर पर्यंत जात होते . भाटघर धरणाचे पाणी पंढरपुरात आल्यानंतर राजेवाडीचे पंढरपूरकडे जाणारे पाणी बंद करण्यात आल्याचे समजते . सांगोला तालुक्याला सद्य स्थितीत विविध पाणी योजनातून पाणी मिळू लागले आहे . आणखी काहीं योजनांचे पाणी भविष्यात त्यांना मिळणार आहे . त्या पार्श्वभूमी वर राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाचे बहुतांश पाणी, आटपाडी तालुक्यातच सर्वत्र फिरविणे आता न्यायाचे होणार आहे. याकडे सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले आहे .
राजेवाडी तलावापासून आटपाडी तालुक्यातील सर्व गावे ३५ – ४० किमी अंतराच्या आतच येतात . राजेवाडीपासून ६० किमी अंतरावरच्या पंढरपूर – गोपाळपूर पर्यत राजेवाडी तलावाचे पाणी दिले गेले . मात्र राजेवाडी तलावाच्या उशा – पायशाला असणारा आटपाडी तालुका राजेवाडीच्या पाण्यापासून हेतूत : वंचित ठेवण्यात आला . राजेवाडी तलावाचे पाणी न मिळाल्याने आटपाडी तालुक्यातील ६ ते ७ पिढ्यांची अक्षरश : राख रांगोळी झाली . पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी पुरेसे पाणी नसल्याने आटपाडी तालुक्यातील हजारो कुटुंबाना स्थलांतरीत व्हावे लागले . मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या गोदी मध्ये हमालीसाठी हजारो कुटुंबे मुंबईत अनंत अडचणींचा सामना करत स्थिरावली . कापड व्यवसाय, गिरणी कामगार म्हणून आटपाडी तालुक्यातील शेकडो कुटुंबांनी बार्शी, विटा, कुंडल, इचलकरंजी, मुंबई, सुरत, अहमदाबादला जवळ केले . गलाई कामगार म्हणून भारतातील प्रत्येक शहरात, अगदी भारताबाहेर लगतच्या देशांमध्ये हजारो आटपाडी तालुका वाशीय मायभूमीला सोडून गेले . उसतोडीसाठी सधन जिल्ह्यात महिनोन महीने जाणे, मेंढपाळी च्या निमित्ताने पश्चिमेला तळकोकणा पर्यत तर पूर्वेला उस्मानाबाद, लातूर, नांदेडपर्यत जाणे, हे हजारो आटपाडी तालुका वाशीयांच्या पाचवीला पुजले होते . डवरी – घडशी यांचा मुलुख अशी आणखी एक ओळख असणाऱ्या या भागातल्या शेकडोंनी नानाविध सोंगे काढून भारतभर भ्रमंती केली . नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी अन्य भागात जाणारी असंख्य कुटूंबे आटपाडी तालुक्यातील भेटतील . बहुरूपी, सर्कस, तमाशा, नाटक इत्यादींचे कलाकार, कामगार म्हणून शेकडो आटपाडीकरांनी समस्त भारतीयांना आपलेसे केले आहे . जीवन असलेल्या पाण्याच्या दुर्भिष्यामुळे आटपाडी तालुक्याची अक्षरश : होरपळ झाली . २५० एम .सी .एफ .टी . च्या आटपाडी शहरालगतच्या तलावाच्या १२ पट मोठा असलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी संपूर्ण आटपाडी तालुक्याला द्यावे, असे स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याच राज्यकर्त्यांना कधी वाटले नाही . अथवा आटपाडीशी संबधीत तालुका, विभाग, जिल्हा, राज्य, देश स्तरावरील कोणत्याही लोकप्रतिनिधींना कधी कणव आल्याचे दिसले नाही, आणि मरणासन्न अवस्थेतल्या इथल्या जनतेनेही कधी या निर्घूण अन्याया विरोधात आवाज उठविला नाही . हे दुर्दैवी वास्तव आहे .
वास्तवीक *म्हसवड* हे राजेवाडी गावापासून २० किमी इतके लांब, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातले गाव आहे . मात्र आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावालगतच्या आणि राजेवाडी हद्दीतल्या या तलावाचे नाव म्हसवड तलाव आहे, ते तात्काळ बदलून *राजेवाडी तलाव* असे शासन दप्तरी नामकरण झाले पाहिजे. ही आमची पहिली प्रमुख मागणी आहे . राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाचे विभागीय व्यवस्थापन आटपाडी शहरापासून १२० किमी वरील सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आहे . कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्या माध्यमातून यावर व्यवस्थापन केले जात आहे . या म्हसवड ( राजेवाडी ) तलावाचा उपविभाग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे, तर शाखा कार्यालय सोलापूर जिल्ह्याच्याच सांगोला तालुक्यातील महुद येथे आहे . फलटण येथील म्हसवड तलावाचे व्यवस्थापन तातडीने बदलून याचे शासकीय व्यवस्थापन सांगली जिल्हा जलसंपदा कडे वर्ग केले जावे . या तलावाच्या उपविभागाचा कारभार आटपाडीतून सुरु केला जावा आणि शाखा कार्यालय राजेवाडी येथे सुरू केले गेले पाहिजे . अशी आमची दुसरी न्याय मागणी आहे . आटपाडी तालुक्यातील या तलावाचे बहुतांश पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना जाते आहे . आटपाडी तालुक्यातील नाममात्र क्षेत्राला याचा उपयोग होतो आहे . आटपाडी शहराच्या पश्चिमेला, नैरुत्य ते वायव्य या दरम्यानच्या दिशेला अनेक तलावांची ( १० पेक्षा जास्त ) शृंखला आहे . राजेवाडी तलावाच्या नव्या कॅनॉलच्या माध्यमातून राजेवाडी तलावाचे बहुंताश पाणी आटपाडी तालुक्यातील सर्व तलावांना कॅनालने जोडत *तलाव जोड योजनेतून* सर्व तालुकाभर फिरवत नंतर ते पाणी सांगोला तालुक्यातल्या बुद्धीहाळ तलावाकडे नेले पाहिजे . तसेच सांगोला तालुक्यातही अन्यत्र नेले पाहीजे . माण तालुक्यातल्या ज्या क्षेत्राला या तलावाचे पाणी मिळते . ते पूर्वीप्रमाणेच पुढेही कायम ठेवले पाहीजे .
राजेवाडी तलावातला गाळ काढून आटपाडी तालुक्यातील शासकीय अथवा खाजगी पडीक, मुरमाड जमिनीवर ओतला पाहीजे. ज्या योगे शेतीलायक नवीन क्षेत्र तयार होवू शकेल . म्हसवड जवळच्या कारखेल जवळून गेलेल्या नीरा उजव्या कॅनालचे पाणी राजेवाडी तलावात सायपनने येवू शकते . तसेच राजेवाडी तलावाचे पाणी आटपाडी तालुक्यातल्या इतर तलावांमध्ये सायपनने जावू शकते . नीरा कालव्यातून राजेवाडी तलाव बारमाही प्रवाहीत ठेवण्यासाठी नीरेचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे . याशिवाय गतवर्षी उरमोडीचे पाणी राजेवाडीत आणले गेले होते . हा राजेवाडी तलाव सतत प्रवाही रहावा यासाठी शासनाने उरमोडी अथवा नीरेच्या पाण्यातून राजेवाडी तलावासाठी खास तरतुद केली पाहीजे . हा तलाव बारमाही केल्यानंतर राजेवाडी तलावाचे पाणी आटपाडी तालुक्यात सर्वत्र फिरवून नंतर ते अन्य तालुक्यांनाही दिले जावे . त्यास आमचा विरोध असणार नाही .
राजस्थानच्या जैसेलमेर इतकी उष्णतेची घनता आटपाडी तालुक्यातील उन्हाची आहे . हे लक्षात घेऊन राजेवाडी तलाव ते बुध्दीहाळ तलाव या दरम्यान येणाऱ्या आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील सर्व तलावाचे खुली पात्रे त्यांचे कॅनॉल पात्रांचा, प्रचंड सौर उर्जा निर्मितीसाठी, सौर उर्जेचा प्रचंड प्रकल्प आटपाडी तालुक्यात राबविला गेला पाहीजे . या सौर उर्जा प्रकल्पातून प्रचंड वीज मिळेल . शिवाय सर्वच तलावांच्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबून, पाणी साठ्याची मोठी हानी टळेल. आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेला प्रचंड मोठया व प्रचंड लांब अंतराच्या डोंगर रांगा आहेत . यावर पवन उर्जा प्राप्तीसाठी पवनचक्क्या उभारल्यास यातून मिळणाऱ्या विजेच्या उत्पनातून व सौर उर्जेच्या उत्पनातून राजेवाडी ते बुद्धीहाळ तलावापर्यतच्या तलाव जोड प्रकल्पासाठी लागणारा खर्च, सौर उर्जा, पवन उर्जा निर्मिती साठीचा होणारा खर्च आणि राजेवाडी तलावाचा गाळ काढणे, अन्यत्र टाकणे, उरमोडी धरण अथवा नीरा कालव्यातून राजेवाडीत पाणी आणणे, यासाठीचा सर्व खर्च या सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीतून निघू शकतो, तसेच पाण्याचे होणारे प्रचंड बाष्पीभवन रोखले जावू शकते आणि काही वर्षात हे खर्चाचे पैसे निघाल्यानंतर हे सौर, पवन उर्जेचे प्रकल्प प्रचंड नफ्याचे उत्पन्न दिल्याशिवाय राहणार नाहीत .
या सर्व बाबी लक्षात घेऊन आटपाडी तालुक्याच्या राजेवाडीतल्या म्हसवड तलावाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यावर शतकापासून होत असलेल्या अन्यायावर राज्य सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा. राज्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्र लिहून राजेवाडीच्या संदर्भाने आटपाडी तालुक्यावरील अन्याय दुर व्हावा यासाठी प्रयत्न करावेत .
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या मागण्या सत्यात येण्या संदर्भाने विशेषतः सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं सह राज्यातील लोकप्रतिनिधीनी विधीमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी आवाज उठवावा आणि राज्यातल्या संसद सदस्यांनी आटपाडी तालुक्याच्या न्याय मागण्याच्या समर्थनार्थ राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहावीत, असे प्रसार माध्यमातून आग्रही आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .