जिल्हाताज्या घडामोडी

जंगलामध्ये पाणी व गवताची कमतरता : बहुतांशी वन्यप्राणी लोकवस्ती नजीक: शेतकरी भयभीत: बंदोबस्त करावा : मागणी

जंगलामध्ये पाणी व गवताची कमतरता : बहुतांशी वन्यप्राणी लोकवस्ती नजीक:

शेतकरी भयभीत: बंदोबस्त करावा : मागणी


सिंहवाणी ब्युरो, गारगोटी/शैलेंद्र उळेगड्डी,
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड,राधानगरी, आजरा,चंदगड,गगनबावडा,शाहूवाडी आदी तालुके वन हद्दिने वेढले आहेत.या वन हद्दीन मध्ये गवे, बिबटे,वाघ,अस्वल,सांबर,डुक्कर,भेकर आदी जनावरे मोठ्या प्रमाणात आढळतात यामध्ये बहुतांशी गवे रेडे हे लोक वस्ती शेजारीच मुक्काम ठोकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सध्या जंगलामध्ये पिण्याचे पाणी व गवताची कमतरता असल्याने बहुतांशी वन्यप्राणी लोकवस्ती नजीक वावरत असल्याने शेतकरी भयभीत झाले असून वनविभागाने लवकरात लवकर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या कडक उन्हाळा चालू असून वळीव पावसाने देखील बऱ्याच ठिकाणी हुलकावणी दिल्याने वन हद्दीमधील वन्य प्राण्यांसाठी असणाऱ्या पाणवठ्याच्या ठिकाणी पाणी कमी पडत असल्याने व मार्च महिन्यात बहुतांशी जंगलांना वनवे लागल्याने जंगलातील गवत देखील जळून नष्ट झाले आहे यामुळे खायला अन्न नाही व प्यायला पाणी नाही या दुहेरी विवंचनेत सापडलेल्या वन्य प्राण्यांना लोकवस्ती नाजिक येऊन अन्न शोधवे लागत आहे.


शेतकऱ्यांच्या जीवाला धोका.

सध्या शेतकरी उसाचे गाळप पूर्ण झाल्याने नवीन लागण व खोडव्याना पाणी देणे हे काम करत आहेत.शेती पंपांच्या वीजेचे वेळापत्रक पाहिल्यास दिवसा कमी तर रात्री जादा वेळ वीज पुरवठा होत असल्याने रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांच्या कडून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. या कारणाने जंगल हद्दी शेजारील गावांना दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी जोर धरत आहे.

उपाययोजनांची आवश्यकता.

वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी व मुबलक गवत हे वन हद्दीमध्येच उपलब्ध होणे गरजेचे असून वन हद्दी मध्ये वन तळ्यांची संख्या वाढवणे व विविध जातीच्या गवतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. संपूर्ण वन हद्दी शेजारी चर खोदणे,गडगा बांधणे, व काटेरी तारेचे कुंपण करणे आदी उपायोजना कराव्यात अशी मागणी वन हद्दी शेजारील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button