ऑपरेशन सिंदूर’चं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी… बेळगावच्या स्नुषा;

ऑपरेशन सिंदूर’चं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी..
बेळगावच्या स्नुषा;
सिंहवाणी ब्युरो / बेळगाव :
‘ऑपरेशन सिंदूर’ने केलेल्या
कारवाईची माहिती दोन महिला लष्करी अधिकारी देत आहेत. यापैकी महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या स्नुषा आहेत. गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे सुपुत्र कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्या त्या पत्नी असून, त्यांच्यामुळे बेळगावची मान उंचावली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील भारतीयांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केल्यानंतर बुधवारी (ता. ७) दोन महिला सैन्य अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना लष्कराने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. यात लष्कराच्या कर्नल सोफिया व वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा समावेश होता.
यानंतर या दोन महिला अधिकारी कोण? याबाबत अनेकांना औत्सुक्य होते. कर्नल सोफिया या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्म्सच्या अधिकारी असून, त्या मूळच्या वडोदरा येथील आहेत. तसेच त्यांचे आजोबा आणि वडील हेदेखील पूर्वी लष्करात होते. सोफिया यांचे पतीदेखील लष्करात कर्नल पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळाली.
आता त्यांची माहिती पुढे आली असून, पती ताजुद्दीन बागेवाडी हे गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे सुपुत्र आहेत. सध्या ते लष्कराच्या मेकॅनाईस इन्फंट्रीत झाँशी येथे कार्यरत आहेत. ताजुद्दीन व सोफिया यांनी २०१५ मध्ये प्रेमविवाह केला. २०१६ मध्ये बहुराष्ट्रीय सैन्य दलाच्या युद्धसरावात भारतीय लष्कराचे नेतृत्व केले होते. पहिला महिला अधिकारी म्हणून त्यांना हा मान मिळाला. २००६ सालात काँगो या देशात संयुक्त राष्ट्रसंघ शांती सेनेच्या लष्करी निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.