क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खळबळजनक पोलीस तपासात 24 तासात छडा मडिलगे येथील दरोडा नव्हे.. तर कर्जबाजारी झाल्याने नवऱ्याने केला बायकोचा खून…

पोलीस तपासात 24 तासात छडा

मडिलगे येथील दरोडा नव्हे.. तर कर्जबाजारी झाल्याने नवऱ्याने केला बायकोचा खून…

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी;
सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता.आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली आहेत.तो कर्जबाजारी असलेने ती परत करण्यासाठी सुशांत हा त्याची पत्नी पुजा गुरव हिचेकडे सोन्याचे दागिणे गहाण ठेवून पैसे काढून लोकांची देणी व बॅन्केची कर्ज भागवूया तसेच आपल्याला असलेल्या सोरायसीस या आजारावर औषधोपचार करु या असे म्हणत होता.रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी मध्यरात्री 02.45 वा.चे सुमारास सुशांत व मयत पत्नी पुजा यां दोघांमध्ये वादावादी होवुन पत्नी पुजा गुरव हिने यापूर्वी देखील तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळी पण सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्ही काय करायचे करा असे म्हणाल्याने आरोपी सुशांत गुरव याने रागाच्या भरात घरातच असलेल्या दगडाने व शेतात काम करण्याच्या छोट्या फावड्याने (खोऱ्याने) पत्नी पुजा हिचे डोकीत मारहाण करुन गंभीर जखमी करून जीवे ठार मारले असल्याचा व दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली दिलेने सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करुन फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व आजरा पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई करत गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणला आहे.
याबाबत माहिती अशी,गुरव गल्ली मडीलगे येथील सुशांत सुरेश गुरव हे त्यांचे पत्नी पुजा सुशांत गुरव व त्यांची दोन लहान जुळी मुले सोपान व मुक्ता यांचेसह दिनांक 18 मे 2025 रोजी घरी झोपलेले असताना रात्री 02.30 वा. चे सुमारास फिर्यादी सुशांत गुरव हे घराचे पाठीमागे लागून असलेल्या बाथरुमध्ये गेला. त्यानंतर 05 मिनीटांत त्यांना पत्नी पुजा गुरव हिचा ओरडण्याचा आवाज आला. म्हणून ते बाथरुम मधून बाहेर येवून पाठीमागील दरवाजातून घरात आले असता त्यांना घरातील स्वयंपाक खोलीत एका इसमाने त्यास पकडून खाली वाकवून हाताने मारले, तेव्हा त्यांची पत्नी पुजा हिला दोन इसमांनी पकडून धरले होते व तीसरा इसम तीच्या हातातून पैशांची शबनम बॅग ओढत होता. त्यावेळी त्याने पैशांची बॅग सोडून दे म्हणून सांगत होता. तेव्हा त्यातील एका इसमाने त्यांचे पत्नीचे डोक्यात लोखंडी रॉडने मारले व ती जखमी होवून पडली. त्यानंतर ते तीघे पैशांची शबनम बॅग घेवून समोरच्या दरवाजातून व एकजण मागील दरवाजातून पळून गेले. त्यावेळी फिर्यादी सुशांत गुरव हे मुलांना घेवून बाहेर आले व शेजारील लोकांना ओरडून उठविले, अशी फिर्याद सुशांत गुरव यांनी आजरा पोलीस ठाणेस दिली होती.
घटनास्थळी श्वान पथक,आय-कार व न्यायवैद्यक तज्ञांचे पथक यांना बोलाविण्यात आले, तसेच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व स्टाफ, आजरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर व स्टाफ असे लागलीच घटनास्थळी दाखल झाले. नमुद गुन्ह्याचा एल.सी.बी. व आजरा पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 13 तपास पथकांचे मार्फत तपास करीत असताना फिर्यादी याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने माहिती घेत असताना सदरची घटना ही खुन व दरोडा पडला आहे असे भासवण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादी याचा बनाव हा तपास पथकाच्या निदर्शनास आलेने तपास पथकाने फिर्यादी यांचेकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करुन घेत असताना त्याने दिलेला फिर्यादी जबाब व प्रात्यक्षिक यामध्ये संदिग्धता असल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी याचेवर संशय बळावलेने घटनास्थळावरील परिस्थिती, भौतीक पुरावे, गोपनीय माहिती तसेच फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा फिर्यादी सुशांत सुरेश गुरव रा.मडीलगे ता. आजरा यानेच केल्याने गुन्ह्यातील फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button