गोकुळ : नवा अध्यक्ष कोण ? अरुण डोंगळे यांचा हसन मुश्रीफ अन् सतेज पाटील यांच्याशी चर्चेनंतर राजीनामा,

गोकुळ : नवा अध्यक्ष कोण ?
अरुण डोंगळे यांचा हसन मुश्रीफ अन् सतेज पाटील यांच्याशी चर्चेनंतर राजीनामा,
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ अर्थात गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळं गोकुळच्या अध्यक्षपदावरुन सुरु झालेलं राजकारण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. मात्र, अरुण डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर राजीनामा दिला आहे. अरुण डोंगळे यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष करण्यात आलं होतं. गोकुळच्या संचालकांनी देखील राज्यातील राजकारण वेगळं आणि जिल्ह्यातील राजकारण वेगळं अशी भूमिका घेतली होती. गोकुळच्या 21 पैकी 19 संचालक देखील या मताचे असल्यानं अरुण डोंगळे यांना राजीनामा द्यावा लागला. अरुण डोंगळे गोकुळचे व्यवस्थापकीय संचालकांकडे राजीनामा सोपवला.
हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याशी चर्चा अन् राजीनामा
गोकुळमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती सत्तेत नसून शाहू विकास आघाडीची सत्ता आहे. सहकारात राजकारण नको अशी भूमिका गोकूळच्या संचालकांनी घेतली होती. त्यामुळं अरुण डोंगळे यांच्यापुढं गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. गोकुळचे एमडी यांच्याकडे अरुण डोंगळे यांनी राजीनामा सोपवला आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर डोंगळे यांनी राजीनामा दिला आहे.
सतेज पाटलांचा अंदाज खरा ठरला
सतेज पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी अरुण डोंगळे राजीनामा देतील असा विश्वास व्यक्त केला होता. गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली नव्हती, असं देखील सतेज पाटील म्हणाले. गोकुळच्या अध्यक्षपदाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार 15 मे रोजी अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, ते लवकरच राजीनामा देतील असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केलाहोता.
अरुण डोंगळेंच्या मुलाला जिल्हा परिषदेची उमेदवारी देणार : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ म्हणाले की, अरुण डोंगळे यांची इच्छा गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा व्हावा, अशी होती. अरुण डोंगळे यांच्या मुलाला कौलव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचं मान्य केलं आहे, असं हन मुश्रीफ म्हणाले. गोकुळची निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढवली नव्हती. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात शाहू विकास आघाडी म्हणून लढवली होती, असं हसन मुश्रीफ म्हणाले. नव्या अध्यक्षाचं नाव अरुण डोंगळे यांना कळवण्यात आल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले होते.