ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गोकुळ अध्यक्षपद.. शशिकांत पाटील चुयेकरना डावलून नाविद मुश्रीफ याची वर्णी

गोकुळ अध्यक्षपद..

शशिकांत पाटील चुयेकरना डावलून नाविद मुश्रीफ याची वर्णी

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती. अनेक राजकीय चर्चाना सुद्धा वेग आला होता. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान नविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे गोकुळमध्ये राज्यपातळीवरील हस्तक्षेप दिसून आला.

गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा लागली होती. गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे पण अशी भूमिका घेतल्याने गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते. आज तो लिफाफा खोलण्यात आला. नविद परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलवण्यात आल्याने त्यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक रंगली होती.

कोल्हापूरच्या सत्ता केंद्रांच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात
कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत. दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट चुलीशी जोडला गेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढाऱ्यांना हवीच हवी असते. राज्यात महायुती असल्याने सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्येच कोंडी करण्याचा सुद्धा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे हे सुद्धा यानिमित्ताने लपून राहिलेलं नाही. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील समझोता एक्स्प्रेस राजकारण सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अरुण डोंगळे यांचं बंड शांत करण्यात आलं तरी महाडिक गटाच्या कोल्हापूर-मुंबई फेऱ्याही सुरु होत्या. त्यामुळे गोकुळमध्ये वेगळं काही घडणार का? अशीही चर्चा रंगली. मात्र, संचालकांनी एकजूट दाखवल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button