रील बनवताना खरंच बसला फास; गळफास कसा घ्यायचा याचे रील बनवणं पडलं महागात

रील बनवताना खरंच बसला फास;
गळफास कसा घ्यायचा याचे रील बनवणं पडलं महागात
सिंहवाणी ब्युरो / जामखेड :
सोशल मीडियावर वेगवेगळ्या
प्रकारचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले बरेच व्हिडिओ धक्कादायक घटनांचे असतात. काही लोक अशी कृत्यं करतात, ज्यामुळे त्यांचा जीव जाण्याचा धोका उद्भवतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका तरुणाचा आहे. गळफास कसा घ्यायचा हे दाखवताना त्याच्याबरोबर जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. ही घटना अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रकाश बुडा असे या तरूणाचे नाव आहे. तो नेपाळचा रहिवासी आहे. गळफास कसा घ्यायचा याचे रील बनवणं महागात पडलं आहे. गळफासचं रील बनवताना प्रत्यक्षात त्याला गळफास बसला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने युवकाला रुग्णालयात दाखल केले. सध्या या युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
फाशी कशी घ्यावी? रील बनवत होता
अशा प्रकारचा मूर्खपणा कोणी करु नये आणि कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन देऊ नये. तसेच असले व्हिडीओ शेअर करू नये. प्रकाश बुडा हा जामखेडमधील एका हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी आहे. सकाळी 8 वाजता तो जामखेड शहरातील हॉटेलच्या बाजूला असलेल्या नदीवर गेला. तिथे त्या ठिकाणी फाशी कशी घ्यावी असा रील बनवत होता. मात्र या नादात त्याला खरचं फाशी बसली आणि तो बेशुद्ध झाला.
गळफास बसताच प्रकाश बेशुद्ध
प्रकाश बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या मित्रांना वाटले. त्यामुळे ते प्रचंड घाबरले त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला. सामाजिक कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी नाडी परीक्षण केल्यानंतर तो जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याला तात्काळ रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.
क्षणिक प्रसिद्धीसाठी जीवावर बेतणारे व्हिडीओ
इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात मृत्यू झाल्याच्या या पूर्वीही काही घटना घडल्या आहेत. क्षणिक प्रसिद्धीसाठी लोक आपल्या जीवाची पर्वा करत नसल्याचं यातून दिसतं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. फसवणूक, जीवावर बेतणारे प्रसंग आणि फेक न्यूज पसरवण्याच्या घटनांमध्ये सोशल मीडियाचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे