अमरावतीत भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची हत्या: आधी चारचाकी कारने उडवले, नंतर छातीवर सपासप वार,

अमरावतीत भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची हत्या:
आधी चारचाकी कारने उडवले, नंतर छातीवर सपासप वार,
सिंहवाणी ब्युरो / अमरावती
अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. एका चारचाकी कारने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवले. त्यानंतर त्यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पसार झाले. मात्र काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली .
अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर कार्यरत होते. हल्ल्यानंतर त्यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आधी चारचाकी कारने उडवले, नंतर छातीवर सपासप वार
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर हे दुचाकीवरून निघाले होते. मागून एका चारचाकीने त्यांना उडवले. ते दुचाकीवरून खाली पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले. त्यांच्या छातीवर, पोटावर वार करून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता.
अमरावती पोलीस आयुक्त घटनास्थळी, काही तासांत दोघांना अटक
त्यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले. फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी लगोलग दोन पथके रवाना केली. काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.
पैशावरून वाद झाला, मध्यस्थी करण्यासाठी पोलीस अधिकारी गेले होते, त्याचाच राग मनात धरून हत्या ?
हत्या प्रकरणात प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचे पोलिसांची माहिती आहे. 20 जून रोजी अब्दुल कलाम यांचा बंधू अब्दुल सलाम यांचा काही लोकांशी पैशावरून वाद झाला होता, त्यावेळी अब्दुल कलाम हे मध्यस्थी करायला गेले होते. त्याचा राग धरून ही हत्या झाल्याची माहिती आहे.
एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर जर असा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्नही अमरावतीकर विचारीत आहेत.