क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेनापती कापशी येथील शिक्षकाला संतप्त पालकांचा बेदम चोप: संबद्धीत शिक्षकचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन : शिक्षकास अटक

सेनापती कापशी येथील शिक्षकाला संतप्त पालकांचा बेदम चोप:

संबद्धीत शिक्षकचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन : शिक्षकास अटक

सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
सेनापती कापशी (ता. कागल) येथील न्या. रानडे विद्यालयातील सहायक शिक्षक निसार मुल्ला (वय ५५) याच्यावर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप होताच पालकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शाळेच्या आवारातच त्याला बेदम चोप दिला. या घटनेने संपूर्ण कापशी गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध फेरीही काढली.

फिर्यादी पीडित मुलीने मुरगूड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी शिक्षक गणित विषय शिकवत असून, तो वर्गात मुलींना डोळे मारणे, चिकटून उभे राहणे, अंगावर पडणे, सतत मुलींच्याच ओळीतून फिरणे, अश्लील शब्द वापरणे आणि शिवीगाळ करून मुलींना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन सातत्याने करीत होता. गेले कित्येक दिवस हा प्रकार सुरू होता. अखेर मुलींनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर मंगळवारी हा उद्रेक झाला.

निसार मुल्ला हा न्या. रानडे विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होता. काही महिन्यांपासून विद्यार्थिनींबरोबर अश्लील बोलणे, अंगाशी लगट करणारे वर्तन करणे, तसेच मानसिक त्रास देणे, असे प्रकार सातत्याने घडत होते. अनेक विद्यार्थिनींनी हा त्रास पालकांना सांगितल्यानंतर मंगळवारी पालकांनी शाळेवर धडक दिली. सकाळच्या सत्रात पालक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमा झाले आणि थेट शाळेच्या आवारात घुसून मुल्ला याला पकडून बेदम मारहाण केली. काही कर्मचाऱ्यांनी मुल्लाला कार्यालयात लपवण्याचा प्रयत्न केला, तरीही पालकांनी तेथेही घुसून त्याला चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निसार मुल्लाला ताब्यात घेतले. पोलिस त्याला नेत असताना पालकांनी पोलिस वाहन अडवून त्वरित कठोर कारवाईची मागणी केली. सहायक पोलिस उपअधीक्षक ए. बी. पवार यांनी पालकांना कारवाईचे आश्वासनानंतर
पोलिसांना सोडण्यात आले.

मुल्लाला यापूर्वीही मुरगुडात चोप

काही वर्षांपूर्वी मुल्ला याला मुरगूड शाळेत मुलींशी गैरवर्तन करीत असल्यामुळे पालकांनी बेदाम चोप दिला होता. त्यावेळी त्यांची बदली कापशी रानडे हायस्कूल येथे झाली. गेल्या काही महिन्यांपासून मुल्लाचे मुलींशी अश्लील वर्तन चालू होते. मात्र, तक्रार करण्यास कोणी पुढे आले नाही; पण होणारा त्रास मुलींना सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या पालकांना सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला.

तत्काळ कारवाई

या गंभीर घटनेनंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने तातडीने पत्रक काढून निसार मुल्ला याला कायमस्वरूपी बडतर्फ केल्याचे जाहीर केले. संस्थेने पालकांची माफी मागून अशा शिक्षकांवर शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर कापशी गावात संतप्त वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ आणि पालकांनी निषेध फेरी काढली. अशा विकृत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात थारा देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

आठवडी बाजार बंद ठेवून निषेध

शिक्षकानेच विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन व अश्लील वर्तन केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आठवडी बाजार बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेमुळे गावासह पंचक्रोशीत तणावाचे वातावरण होते.

१५ पालकांची पोलिसांत तक्रार

निसार मुल्ला याचे दहा वर्षांपासून मुलींशी गैरवर्तन सुरू होते. याबद्दल मुली घाबरून घरी सांगत नव्हत्या. परंतु, काही मुलींनी आपल्या पालकांना होत असलेला प्रकार सांगितल्यानंतर दहा ते पंधरा पालकांनी पुढाकार घेऊन संबंधित शिक्षकाला चोप देऊन त्याच्याविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.


मारहाण पाहून शिक्षिकेला आली चक्कर

शाळेत येऊन पालकांनी संबंधित शिक्षकास मारहाण केली. त्यावेळेस मारहाण आणि संतप्त जमाव पाहून पीडित मुलींच्या वर्गशिक्षिका यांना चक्कर आल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button