*नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या लढ्याला मोठे यश; ५०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीला अखेर मंजुरी, शासन निर्णय (GR) निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा समितीचा निर्धार*

*नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या लढ्याला मोठे यश;
५०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीला अखेर मंजुरी, शासन निर्णय: (GR) निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा समितीचा निर्धार*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या ‘नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती’च्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर मोठे यश आले आहे. शासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त असलेली ५०१२ पदे भरण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय (GR) लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासनही शासनाकडून मिळाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून समिती आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरली होती. बेरोजगार आणि तासिका तत्त्वावर (CHB) काम करणाऱ्या प्राध्यापकांना न्याय मिळावा, यासाठी समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. या लढ्यात समितीने मागील शैक्षणिक वर्षात तब्बल ९ सत्याग्रह आंदोलने, अनेक निवेदने, तसेच प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या अथक प्रयत्नांचाच परिणाम म्हणून शासनाला हा सकारात्मक निर्णय घेणे भाग पडले, असे समितीने म्हटले आहे. या यशानंतरही समितीने एक खंत व्यक्त केली आहे. “ज्या बेरोजगार आणि शोषित प्राध्यापकांसाठी आम्ही हा लढा देत आहोत, त्यांच्याकडून आंदोलनावेळी अपेक्षित संख्याबळ आणि आर्थिक पाठिंबा मिळत नाही. तरीही, समितीचे निष्ठावान सदस्य (मावळे) सर्व अडचणींवर मात करून लढत राहिले, याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे,” अशी भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त .केली. शासनाने पदभरतीला मान्यता दिली असली तरी, जोपर्यंत प्रत्यक्ष शासन निर्णय निघत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत समिती शांत बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नेट-सेट, पीएच.डी. धारक आणि CHB प्राध्यापकांनी समितीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
मागील वर्षभरातील समितीची प्रमुख आंदोलने
संघर्ष समितीने आपल्या मागण्यांसाठी मागील वर्षभरात पुणे आणि मुंबई येथे अनेक आंदोलने केली. यामध्ये खालील प्रमुख आंदोलनांचा समावेश आहे: १) दिनांक २४ जून २०२४ – बेमुदत सत्याग्रह-६ , स्थळ:- संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कार्यालय पुणे. २) दिनांक १ ते ९ ऑगस्ट २०२४ – बेरोजगाराच्या वारी मुख्यमंत्र्याच्या दारी, स्थळ:- संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कार्यालय पुणे. ३) दिनांक १६ ऑगस्ट २०२४ – बेरोजगाराच्या वारी कुलगुरूच्या दारी , स्थळ:- महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठाच्या पुढे. ४) दिनांक २५ सप्टेंबर २०२४ – मुख्यमंत्र्यांच्या गावी सामूहिक आत्महत्या आंदोलन , स्थळ:- माजी मुख्यमंत्र्यांचे दरे गाव. सातारा जिल्हा. ६) दिनांक २० ते २१ फेब्रुवारी २०२५ – बेमुदत सत्याग्रह आंदोलन-७, स्थळ:- संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कार्यालय पुणे. ७) दिनांक १ ते ६ मार्च २०२५- बेमुदत सत्याग्रह-७ आंदोलन स्थळ:- आझाद मैदान, मुंबई. ८) दिनांक ७ ते १५ एप्रिल २०२५ पासून- बेमुदत सत्याग्रह-८ आंदोलन स्थळ:- आझाद मैदान, मुंबई. ९) दिनांक २८ जून २०२५ पासून- बेमुदत सत्याग्रह-९ स्थळ:- आझाद मैदान, मुंबई.
‘ बऱ्याच वर्षांनंतर हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. संघर्ष समितीच्या सर्व शिलेदारांनी ऊन,पाऊस,वारा, कुटुंब याची तमा न बाळगता सत्याग्रह आंदोलन व पदयात्राच्या माध्यमातून हा ऐतिहासिक विजय खेचून आणलेला आहे. आता जीआर निघेपर्यंत हा संघर्ष चालूच राहील.’
प्रा. जोतीराम सोरटे
समन्वयक, नेट,सेट, पीएचडी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.