कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार :ना. प्रकाश आबिटकर

कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार :ना. प्रकाश आबिटकर
सिंहवाणी ब्युरो : मुंबई
राज्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपने राबवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग एक राज्यस्तरीय समिती स्थापन करीत आहे. या समितीत कुष्ठरोग निर्मूलन क्षेत्रात कार्यरत तज्ञ, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, व व्यक्तींचा समावेश असणार आहे. समिती दर तीन महिन्यांनी आपला अहवाल सरकारला सादर करेल, आणि तिच्या शिफारसींमुळे कार्यक्रमात सुधारणा व अंमलबजावणी अधिक परिणामकारक होईल, असा मला विश्वास आहे.
या उपक्रमाचे अधिक काटेकोर निरीक्षण होण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र निरीक्षण समिती देखील स्थापन केली जाणार आहे. ही समिती शहरी, ग्रामीण आणि शालेय पातळीवर रुग्ण शोध, उपचार आणि पुनर्वसनासाठी मार्गदर्शन करेल.
बैठकीत अनेक स्वयंसेवी संस्थांनी अनुदानवाढीची मागणी केली. आज राज्यात अशा १२ उपचार केंद्रांमध्ये २, ७६४ खाटा आणि ११ पुनर्वसन संस्थांमध्ये १, ८२५ खाटा आहेत. सध्या मिळणाऱ्या अनुदानात वाढ करून प्रतिखाटा ६, ००० रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव, वित्त विभागाकडे सादर केला असून, लवकरच तो मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘कुष्ठरोगमुक्त भारत’ हा संकल्प ही आपली जबाबदारी आहे. या दिशेने राज्य आरोग्य विभागाने “रुग्ण शोध, उपचार आणि पुनर्वसन” या त्रिसूत्रीवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश मी दिले आहेत. आशा सेविका, शालेय आरोग्य तपासणी मोहीम आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक संभाव्य रुग्णापर्यंत पोहोचू शकतो.
विधानभवनातील या बैठकीला आमदार सौ. सुलभा खोडके, तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळाचे प्रतिनिधी, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, कुष्ठरोग सहसंचालक डॉ. संदीप सांगळे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.