ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ढपला पाडायचा उद्योग, राजू शेट्टी यांची पत्रादेवी येथे फडणवीस सरकारवर टीका

शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ढपला पाडायचा उद्योग,

राजू शेट्टी यांची पत्रादेवी येथे फडणवीस सरकारवर टीका

सिंहवाणी ब्युरो / सावंतवाडी
शक्तीपीठ महामार्गातील पत्रादेवी ही गावच्या वेशीवरची देवी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांदा येथील पत्रादेवी हे शक्तीपीठ असल्याचे सांगून राज्यातील भाविकांची व जनतेची फसवणूक करून अदानीच्या फायद्यासाठी व ५० हजार कोटी रूपयाचा ढपला पाडायचा असल्याने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला देण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बांदा येथील पत्रादेवीस घातले.
स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी ११ जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर आज शक्तीपीठ महामार्गाचे शेवटचे मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिरास भेट देवून सावंतवाडी येथील बाधित गावातील ग्रामस्थ ,शेतकरी तसेच पर्यावरण प्रेमींची भेट घेतली. पत्रादेवी मंदिर हे एका गावाच्या वेशीवरची देवी आहे. याठिकाणी कोणतेही मोठे मंदिर अथवा शक्तीपीठ नाही. पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग करून पवनार येथील माहूरगड , औंढा नागनाथ , परळी वैजनाथ , तुळजापूर , पंढरपूर , कोल्हापूरची करवीर निवासनी आई अंबाबाई , जोतिबा ही शक्तीपीठे सध्या अस्तिवात असलेल्या रत्नागिरी -नागपूर महामार्गाने जोडलेली आहेत.
सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून ७ महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे आहेत. १७ वर्षापासून मुंबई -गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग १५ वर्षापासून निधीअभावी रखडला आहे. मग कोकणामध्ये येणारा नवीन शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी ? खरच जर देवेंद्र फडणवीस यांना कोकणचा विकास करायचा असल्यास वरील गोष्टींना प्राधान्य द्यावे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जनतेवर लादला जात आहे. रोजगार हमी योजना , कंत्राटी कामगार , पिकविमा योजना , फळबाग लागवड अनुदान , भात पिकाचे प्रोत्साहन अनुदान , बांधकाम व रस्ते विभागाची प्रलंबित ९० हजार कोटीची बिले यासारख्या गोष्टीत राज्य सरकार आर्थिक आरिष्टात सापडले आहे.राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना ८६ हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करत आहेत. यावेळी मा. आ. वैभव नाईक , डॅा. गजेंद्र परूळेकर , प्रदीप सावंत , कॉ. संपत देसाई ,शिवसेना सहसपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनिल शिंत्रे सर , शेतकरीसंघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर , भाजपचे संघटक संग्रामसिंह कुपेकर , कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विद्याधर गुरबे , मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले , गडहिंग्लज बाजार समितीचे अध्यक्ष्य रामदास पाटील , संतोष मळवीकर,प्रशांत देसाई,दिलीप माने यांच्यासह बांदा परिसरातील गावातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button