जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुदरगडमधील एकत्रित सात धबधबे म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजाना : पालकमंत्री प्रकाश आबिटकर : सवतकडा सात धबधब्यांच्या सुशोभिकरण कामांचे लोकार्पण

भुदरगडमधील एकत्रित सात धबधबे म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजाना

: पालकमंत्री प्रकाश आबिटकर
सवतकडा सात धबधब्यांच्या सुशोभिकरण कामांचे लोकार्पण

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच वर्षाविहारासह जंगल, जल, जमीन, शेती पाहण्याचे पॅकेजच मिळत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.


पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या प्रयत्नातून वनविभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र गारगोटी अंतर्गत दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे येथील वन व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी 3.44 कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामे करण्यात आली आहेत. या सर्व पर्यटनस्थळांच्या विकास कामांचे लोकार्पण व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, माजी सभापती यशवंत नांदेकर यांच्यासह परिसरातील गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून, या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक (कोल्हापूर) जी गुरूप्रसाद यांनी विशेष प्रयत्न केले.
सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल असून, वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ, आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन श्री.आबिटकर यांनी केले. या ठिकाणी कोल्हापूर वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थित पर्यटकांशी साधला संवाद

लोकार्पण सोहळ्या वेळी स्वतः पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी भेटी देत कामांची पाहणी केली. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांनी विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थित ग्रामस्थांसह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालत पर्यटनाचा आनंद लुटला. उत्साही वातावरणात ग्रामस्थ, पर्यटक यांच्याशी संवाद साधत येथील पर्यटन ठिकाणी करण्यात येत असलेली विकास कामे तसेच त्या ठिकाणी आवश्यक स्वच्छतेबाबत विविध विषयांवर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button