बांगलादेशात शाळेवर विमान कोसळलं; 19 जणांचा मृत्यू, तर 164 जण जखमी बांगलादेश वायूसेना विमान अपघात

बांगलादेशात शाळेवर विमान कोसळलं; 19 जणांचा मृत्यू, तर 164 जण जखमी
बांगलादेश वायूसेना विमान अपघात
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेश वायूसेनेचं एफ-7 बीजेआय ट्रेनर विमान सोमवारी (21 जुलै) दुपारी बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधील दियाबारी भागातील माईलस्टोन शाळेच्या परिसरामध्ये कोसळलं.
अग्निशमन सेवा व नागरिक सुरक्षा विभागाचे संचालक ब्रिगेडियर जनरल मुहम्मद जाहेद कमाल यांनी सांगितलं की, या विमान अपघातात 19 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कमीतकमी 164 जण जखमी झाले आहेत.
या अपघातातील सर्व जखमींना ढाका मेडिकल कॉलेजच्या जवळ असणाऱ्या नॅशनल बर्न अँड प्लास्टिक सर्जरी इन्स्टिट्यूट, कुर्मीटोला हॉस्पिटल, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, कंबाईन्ड मिलीट्री हॉस्पिटल आणि उत्तरा मॉडर्न हॉस्पिटलसहित विविध हॉस्पिटल्समध्ये भरती करण्यात आलं आहे. जवळपास 84 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सरकारचे कायदेशीर सल्लागार प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी म्हटलं की, “या अपघातामुळे आम्हाला प्रचंड दु:ख झालेलं आहे. सरकारने आधीच मंगळवारी (22 जुलै) शोक दिवसाची घोषणा केली आहे. यासोबतच, हा अपघात झालाच कसा, याचाही तपास आम्ही करणार आहोत.”
माईलस्टोन कॉलेजचे लेक्चरर रेझुल इस्लाम यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना म्हटलं की, जेव्हा कॉलेज सुटणार होतं, तेव्हाच हा अपघात झालेला आहे. छोट्या इयत्तांचे वर्ग – बालवाडी ते तिसरी वगैरे ज्या इमारतीत भरायचे तिथेच हे विमान आदळलं.”
पुढे ते म्हणाले की, “एक लढाऊ विमान थेट आलं आणि ते इमारतीला धडकलं. या धडकेचा फटका नर्सरी आणि ज्यूनियर सेक्शनमधील अनेक वर्गांना बसला. शाळेचं गेट पूर्णपणे नष्ट झालं असून मोठी आगही लागली होती.”
या शाळेत इयत्ता 10 वी त शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हा अपघात पाहिला, त्याने बीबीसीला सांगितलं की, “आमची परीक्षा होती. मी परीक्षा झाल्यावर बाहेर उभा होतो, जळतं विमान माझ्या डोळ्यासमोर शाळेवर येऊन आदळलं. माझा बेस्ट फ्रेंड माझ्या डोळ्यासमोर मारला गेला.”
शाळा सुटायच्या वेळी हे घडत होतं. पालक बाहेर उभे होते, मुलं सुटीसाठी बाहेर येत होती तेव्हाच हा अपघात घडला.
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) आपल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की, या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुपारी 1.06 वाजता विमानाने वायुसेनेच्या तळावरून टेकऑफ केलं आणि त्यानंतर बिघाड झाल्याचं वैमानिकाच्याही लक्षात आलं. पायलटने विमान नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, ते गर्दीच्या ठिकाणाहून लांब नेण्याचाही प्रयत्न केला पण ते दुर्दैवाने एका शाळेवर जाऊन आदळलं.
अग्निशमन दलाच्या नऊ तुकड्या सध्या बचावकार्य करत आहेत. विमान अपघाताबाबत बांगलादेश सरकारने उद्या मंगळवारी (22 जुलै) राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. या दिवशी सर्व सरकारी, अर्ध-सरकारी, स्वायत्त संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल