*संदीप गिड्डे यांना चांगली संधी देणार* *पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा :

*संदीप गिड्डे यांना चांगली संधी देणार*
*पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
*सिंहवाणी ब्युरो / तासगाव : *
कोरलेली दाढी, डोक्यावर टोपी असा पेहराव असणारे संदीप गिड्डे – पाटील अलिकडच्या काळात ठिकठिकाणी दिसत आहेत. त्यांच्याबद्दल माहिती घेतली त्यावेळी ते ठाकरेंच्या शिवसेनेतून आल्याचे समजले. शेतकरी आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यानंतर आता ते भाजप किसान मोर्चात काम करीत आहेत. त्यांना चार अपत्ये आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सदस्यापेक्षाही चांगली संधी देणार आहोत, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. दिलेला शब्द पाळण्यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसिद्ध आहोत, असेही ना. पाटील यांनी सांगितले.
नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ केसरी’ राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात संदीप गिड्ढे पाटील यांनी अतिशय चांगले काम केले आहे. मध्यंतरी भाजपची सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी तासगाव – कवठेमहांकाळमधून सर्वाधिक नोंदणी करण्याचे काम गिड्डे यांनी करुन दाखवले आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य दिसून येते. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीही त्यांच्याच नेतृत्वाखाली पार पडल्या आहेत.
ते म्हणाले, अलिकडच्या काळात संदीप गिड्ढे हे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिसून येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही ज्यावेळी खोलात जाऊन माहिती घेतली त्यावेळी ते ठाकरेंच्या शिवसेनेतून आल्याचे समजले. शेतकरी चळवळीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पुणतांबा येथून सुरू झालेल्या ऐतिहासिक शेतकरी संपात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अगदी पहाटे झालेल्या चर्चेतील शिष्ठमंडळात गिड्डे सहभागी होते. त्यावेळी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन गिड्ढे यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांनी पहाटे पत्रकार परिषद घेत शेतकरी संप मागे घेतला होता.
मंत्री पाटील म्हणाले, गिड्ढे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, मला चार मुले आहेत. त्यामुळे मला कोणतीही निवडणूक लढता येणार नाही. हाच धागा पकडून पालकमंत्री पाटील म्हणाले, जरी चार मुले असली तरी संदीप गिड्डे यांना जिल्हा परिषद सदस्यापेक्षा प्रशासनात चांगले स्थान देण्याची मी घोषणा करीत आहे. आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसिद्ध आहोत.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, संदीप गिड्ढे यांना चार मुले असली म्हणून काय झाले. त्यांना नेतेगिरी करायला कोणीही अडवले नाही. लवकरच त्यांनाही वरिष्ठ चांगली संधी देतील. राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. ही बंदी उठल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत नांगोळे येथे भरवण्याचे काम गिड्डे यांनी करुन दाखवले आहे.
शेतकरी नेते संदीप गिड्डे – पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. शिवाय ११ हजार १११ गरजू विद्यार्थ्यांना ५५ हजार ५५५ वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. तर वाढदिवसानिमित्त ‘देवाभाऊ केसरी’ ही राज्यस्तरील बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, लोकांना वाटतंय की संदीप गिड्डे इतकं का करत आहेत. निवडणूक वगैरे लढवणार आहेत का. पण मी निवडणूक लढवू शकत नाही. मला चार अपत्ये आहेत. आणि बैलगाडी शर्यतीच्या आडून निवडणूक लढवण्याचा विचारही माझ्या मनात येत आहे. मी शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. मला कोणतेही पद नकोय, पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे.
यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य मिलींद कोरे, नगराध्यक्ष रणजित घाडगे, तासगाव तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष उदय भोसले, तासगाव शहराध्यक्ष स्वाती सूर्यवंशी, सरपंच छायाताई कोळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बैलगाडा प्रेमी, शर्यत शौकिन उपस्थित होते.
*फोटो :*
*कवठेमहांकाळ : तालुक्यातील नांगोळे येथे ‘देवाभाऊ केसरी’ बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.