सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या दर्जात व क्षमतेत वाढ घडविणारा ऐतिहासिक करार” सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या दर्जात व क्षमतेत वाढ घडविणारा ऐतिहासिक करार”
सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर
सिंहवाणी ब्युरो / मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांशी सामंजस्य करार झाला. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (#PHFI) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अॅन्ड मिनिमल अॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (#IMMAST) या संस्थांशी झालेला हा करार, महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा आणि परिणामकारक अध्याय सुरू करणारा ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यानी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झालेल्या बैठकीतील या करारांमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या प्रशिक्षण, संशोधन आणि धोरण निर्मितीत दीर्घकालीन व सकारात्मक बदल घडतील. असे सांगून ना. आबिटकर पुढे म्हणाले, #PHFI च्या माध्यमातून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी क्षमतावाढीचे प्रशिक्षण, नवतंत्रज्ञानावर आधारित संशोधन आणि धोरणात्मक सहकार्य यांचा समावेश असेल. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’ महाराष्ट्रात स्थापन होण्याची शक्यता यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
#IMMAST या संस्थेच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत १,००० परिचारिका, विद्यार्थी व सहयोगी आरोग्य सेवा व्यावसायिकांना अत्याधुनिक सिम्युलेशन आधारित प्रशिक्षण देण्याचे नियोजन असून, यामुळे परिचारिकांमध्ये आत्मविश्वास, व्यावसायिक कौशल्य व सेवा गुणवत्ता वाढेल. राज्यात मास्टर ट्रेनर्स तयार करून प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण व्यवस्था उभारण्याचा आमचा उद्देश आहे.
या दोन्ही करारांमुळे महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा केवळ अधिक सक्षमच नव्हे, तर आधुनिक, विज्ञानाधिष्ठित आणि धोरणात्मकदृष्ट्या सशक्त होईल. राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने हे करार मैलाचा दगड ठरणार आहेत.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मंत्री श्रीमती. आदिती तटकरे, राज्यमंत्री श्रीमती. माधुरी मिसाळ, राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे -बोर्डीकर, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव तसेच दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
……………………………………………………