लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे वसंतरावदादा महाविद्यालयात आण्णाभाऊ साठे यांची जयंती

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे
वसंतरावदादा महाविद्यालयात आण्णाभाऊ साठे यांची जयंती
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
आपल्या साहित्यातून महाराष्ट्रावर आधिराज्य करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न आहे असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील तासगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले “तमाशा या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे आणि ‘गरीबांचा शेक्सपिअर’ म्हणून ओळखले जाणारे आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आण्णाभाऊंनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या जोरावर समाज परिवर्तनाची धगधगती मशाल पेटवली. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी भूमिका बजावली.’माझी मैना गावाकडं राहिली’ व ‘फकिरा’सारख्या अजरामर कलाकृती त्यांनी समाजाला दिल्या. आपल्या साहित्यातून त्यांनी कायमच अन्याय व विषमतेविरुद्ध वाचा फोडली. त्यांच्या ह्या सर्जनशील सामाजिक योगदानाचा वारसा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ. साईनाथ घोगरे यांनी केले.तर आभार प्रा.पल्लवी मिरजकर यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव,ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.