जिल्हाधिकारी कार्यालयातून मठाधिपती अचानक बाहेर; बैठकीतून न बोलताच जाण्याचे कारण अस्पष्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातून मठाधिपती अचानक बाहेर;
बैठकीतून न बोलताच जाण्याचे कारण अस्पष्ट
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
नांदणी मठाचे मठाधिपती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. या निर्णयाने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ते नक्की का बाहेर पडले याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, स्वामीजींनी स्पष्ट शब्दांत बोलण्यास नकार दिला.
नांदणी मठाला भेट देण्यासाठी दाखल झालेल्या वनताराच्या पथकाची आणि भट्टारक पट्टारक जिनसेन मठ नांदणी येथील महाराज यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत नांदणी मठासह कोल्हापूर जिल्ह्याची शान असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा मठाकडे देण्याचा निर्णय होणार होता. परंतु, बैठकीतून सकारात्मक काही निर्णय झाला नसल्याने भट्टारक यांनी निघून जाणे पसंद केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा गुजरात येथे नेण्यात आली. यावर राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर गुजरात येथील वनतारा जामनगर येथील टीम नांदणी मठासोबत चर्चा करण्यासाठी आली होती. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्यासह मठाधिपती जिनसेन महाराज आणि वनतारा टीम खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने उपस्थित होते.
महादेवी हत्तीण नेल्यानंतर जैन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, स्थानिक ग्रामस्थांनीही या कृतीला विरोध केला होता. जिओ बॉयकॉटचा नाराही दिला होता. अंबानींच्या सर्व साधनांवर बंदी घालण्याचा निर्णयानंतर वनतारा संग्रहालयाने या संतापाची दखल घेतली.
कोल्हापूर पोलिसांनी वनताराच्या टीमला विमानतळावर थांबवले होते. यावर भट्टारकांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. कोल्हापूर नांदणी मठातील महादेवी/माधुरी हत्तीला गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यामुळे नांदणीमध्ये हजारोबांधव मोठ्या संख्येने एकत्र येत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता घेतली.
वनताराची टीम जिल्हा पोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. दरम्यान या बैठकीत काय होणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. तर नांदणी गावामध्ये परिसरातील हजारो लोकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
नांदणीनंतर या ३ मठांना नोटीस
बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ येथील श्री शांतिसागर दिगंबर जैन आश्रम, श्री करीसिद्धेश्वर मठ अलकनूर (ता. रायबाग), गुरू महंतेश्वरस्वामी मंदिर बिचले (जिल्हा रायचूर) यांच्याकडे असलेल्या हत्तीबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तेथील तीन हत्तींचे हाल होत असल्याचे कर्नाटक वनविभागाचे मत आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. गोविंद यांनी जून २०२५ मध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल करत तातडीने या हत्तींच्या सुटकेची मागणी केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रतिवादींना चार ऑगस्ट २०२५ पर्यंत हजर राहण्याचे किंवा उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.