आजच्या अस्वस्थ वर्तमानात आण्णाभाऊंचे विचार दिशादर्शक — कॉ. अंकुश कदम

आजच्या अस्वस्थ वर्तमानात आण्णाभाऊंचे विचार दिशादर्शक — कॉ. अंकुश कदम
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांमध्ये केवळ बाबासाहेबांच्या राज्यघटनेने पददलितांना अस्मिता मिळवून दिली,समानतेचा अधिकार दिला .आरक्षणाच्या प्रक्रियेतुन ज्यांनी लाभ घेतला त्यांनी समतेच्या लढ्याकडे पाठ फिरवू नये . काही कर्मठ धर्मवाद्यांमुळे पुन्हा राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचेच अपहरण होताना आपण अनुभवत आहोत. या घटकांना बाबासाहेबांची राज्यघटना मान्य नाही की महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज किंवा अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचारही मान्य नाहीत. विशेषतः २०१४ नंतर काळ जणू अंगावर आला आहे. आजच्या या अस्वस्थ वर्तमानात अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार आजघडीला दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन समतावादी चळवळीतले कार्यकर्ते कॉ. अंकुश कदम यांनी केले. भुदरगड पुरोगामी मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाहू वाचनालय गारगोटी येथे आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अण्णाभाऊंचे साठे यांचे क्रांतिकारी विचार व आजचे वर्तमान या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ.राजीव चव्हाण होते.
सुरवातीला पुरोगामी मंचाच्या कलाकारांनी क्रांतिगीते सादर केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉ. सम्राट मोरे यांनी केले. वक्त्यांचा परिचय कॉ संपत देसाई यांनी करून दिला.
अंकुश कदम आपल्या भाषणात आजचे वर्तमान मांडतांना पुढे म्हणाले की संविधानाशी तोंडदेखली बांधिलकी दाखवत संविधानाची मोडतोड करण्याचे सध्या चालले आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्था खिळखिळ्या झाल्या आहेत. आज एक तर शरण जा किंवा लढा एवढे दोन पर्याय आपल्यापुढे आहेत. आपण लढले पाहिजे. बुद्ध, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे यांचे बोट धरून चालण्याचा निर्धार करू या असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. राजीव चव्हाण यांनी चळवळी तील कार्यकर्त्यांनी रोखठोक भुमिका घेवून नव्याने संघर्ष तीव्र करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन केले.
आभार श्री मानसिंग देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन के के भारतीय यांनी केले. कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार डॉ सुभाष देसाई, कॉ संपत देसाई , महेश पेडणेकर प्रा अर्जुन कुंभार इत्यादी मान्यवर , तसेच मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.