मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठातील माधुरी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक!

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठातील माधुरी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक!

सिंहवाणी ब्युरो / मुंबई
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत मठात आणण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी माधुरी हत्तीणीला, परत आणण्यासाठी शासन सकारात्मक असून, शासनाच्या वतीने रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यात येणार असुन शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.
कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला मान्यता मिळवून देण्यात राज्य शासनाने केलेल्या सहकार्याबद्दल कोल्हापूर वासियांच्या वतीने पालकमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्री महोदयांचे यांचे आभार मानले असल्याचे ना. प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, वन मंत्री ना. गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील,जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, वैद्यकीय मंत्री ना. हसन मुश्रीफ ,नांदणी मठाधीश जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक महास्वामी, जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार व लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अपर सचिव, जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर, इत्यादी प्रमुख उपस्थित होते.