सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची मंदिरे उभारणारे दूरदर्शी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे- – डॉ.बी.एम पाटील*

सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची मंदिरे उभारणारे दूरदर्शी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे-
– डॉ.बी.एम पाटील*
सिंहवाणी ब्युरो / तासगाव :
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे संस्थापक,संकल्पक,शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्राध्यापक व प्रशिक्षणार्थींनींनी दीपप्रज्वलन व भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करून करण्यात आली. प्रशिक्षणार्थी सुप्रिया माने हिने डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर एक कविता सादर केली.अलिषा नदाफ हिने बापूजी साळुंखेंच्या शैक्षणिक, सामाजीक व वैयक्तिक आयुष्य यावर आपले मनोगत सादर करत वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम. पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण व सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून ज्ञानाची खरी मंदिरे उभारली. त्यांचे कार्य हे केवळ शैक्षणिक मर्यादेत न राहता समाज परिवर्तनाची चळवळ होती. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले. त्याचबरोबर ते दूरदर्शी विचारांचे, कर्तृत्ववान आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. विशेषतः ग्रामीण भागातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थांनी अनेक पिढ्यांच्या प्रगतीला हातभार लावला आहे.
यानंतर प्रा. जी के पाटील यांनी बापूजींच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या आयुष्यातील शैक्षणिक संस्था उभारणीपासून ते समाज कार्यापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी सांगितले की बापूजीकडे दातृत्व होते म्हणून त्यांना उत्तम नेतृत्व करता आले.असे त्यांनी मत व्यक्त केले. प्राध्यापक मनोगतामध्ये डॉ.एल.व्ही.भंडारे यांनी बापूजी साळुंखे यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्थेची संपूर्ण माहिती व त्यांच्या आयुष्यातील घडलेले बरेच प्रसंग,ग्रामीण भागातील शाळा तेथील परिसर व ते उभारणी करत असताना आलेल्या अडचणी हे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.एल.व्ही.भंडारे,डॉ.डी.टी.
खजूरकर डॉ.ए.एस.चिखलीकर, प्रा.ए.आर.पंडित ,तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री संजय कुंभार,हणमंत वाघमारे,सुजाता हजारे,अस्मिता साळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता माने व सुमेधा सुतार यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.प्रमोद शेंडगे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार नलिनी निकम यांनी केले.