मृतांच्या स्मृतीत वृक्षारोपणाचा देऊळवाडीतील महिलांचा पर्यावरणपूरक उपक्रम

मृतांच्या स्मृतीत वृक्षारोपणाचा देऊळवाडीतील महिलांचा पर्यावरणपूरक उपक्रम
सिंहवाणी ब्युरो / कडगाव :
गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांची राख नदीत विसर्जित न करता शेतात खड्डा करून विसर्जित करावी आणि त्या ठिकाणी एक झाड लावून त्यांचे स्मारक जपावे असा पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा निर्णय देऊळवाडीतील महिलांनी ग्रामसभेत घेतला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता पाटील होत्या.
यावेळी पर्यावरण संवर्धन, स्मृती जपणूक आणि स्वच्छतेचा संदेश अशा तिहेरी उद्देशाने विविध निर्णय घेण्यात आले. व्याख्याते अजय देशमुख यांनी गावातील महिलांच्या पुढाकाराचे कौतुक करत, गाव बदलायचा असेल तर महिलांचा सहभाग अनिवार्य असा संदेश दिला. याप्रसंगी अलका पाटील, दिपाली पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आनंदी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशा सेविका रूपाली पाटील व सिआरपी सुचिता गुरव यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी उपसरपंच कविता सावर्डेकर, सदस्य सुभाष पाटील, सुनिता वसंत पाटील, बाबुराव पाटील, शिवाजी गुरव, संभाजी कांबळे, संगीता गणपती कांबळे, शिवाजी आबा पाटील, ग्रामसंघ अध्यक्षा सुजाता पाटील, गिता पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी कुलदीप देसाई यांनी केले, तर आभार सुचिता गुरव यांनी मानले.
फोटो: अहिल्यादेवी होळकर प्रतिमेच्या पुजन प्रसंगी सरपंच सुनिता पाटील, अजय देशमुख, कुलदीप देसाई आदी.