मुख्यमंत्र्यांच्या प्राध्यापक भरती निर्देशाला ‘केराची टोपली’? विभागांच्या ढिसाळ कारभार विरोधात संघर्ष समितीचे ‘शिक्षक दिनी’ आझाद मैदानावर आंदोलन*

मुख्यमंत्र्यांच्या प्राध्यापक भरती निर्देशाला ‘केराची टोपली’?
विभागांच्या ढिसाळ कारभार विरोधात संघर्ष समितीचे ‘शिक्षक दिनी’ आझाद मैदानावर आंदोलन*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
७ जुलै २०२५ रोजी विधान भवन मुंबई येथे झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे,अशासकीय महाविद्यालये व शासन अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु आज एक महिना उलटूनही उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या अकार्यक्षम ढिसाळ कारभारामुळे या निर्देशावर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. आजपर्यंत शासन स्तरावर अधिकृत शासन निर्णय (जीआर) निघालेला नाही. यामुळे प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला ‘केराची टोपली’ दाखविण्यात आली आहे. या उदासीनतेचा फटका राज्यातील हजारो नेट सेट पीएचडी धारकांना बसत आहे. त्यांचे भविष्य अंधारात असून NEP 2020 च्या अंमलबजावणीत अपुऱ्या प्राध्यापक संख्येअभावी उच्च शिक्षण व्यवस्थेवर तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबीवर गंभीर परिणाम निर्माण होत आहेत. गुणवंत व पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी आम्ही पुढील मागण्या करीत आहोत –
१.प्राध्यापक भरतीचा जीआर ताबडतोब काढावा.
२. पद भरती प्रक्रिया पारदर्शक व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी.
३.NEP 2020 च्या अंमलबजावणी साठी 100% प्राध्यापक भरती करावी.
शासन स्तरावर या संदर्भात योग्य तो निर्णय न झाल्यास नेट सेट पीएच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत ५ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन छेडले जाईल. याची सर्व जबाबदारी शासनाची राहील.
” मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आत्तापर्यंत प्राध्यापक भरतीचा अध्यादेश ( जीआर ) निघणे अपेक्षित होते. परंतु उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच अर्थ विभाग यांच्यातील समन्वय अभाव व दोन्ही विभागांचा ढिसाळ कारभार याचा फटका उच्चशिक्षित नेट सेट पीएचडी धारकांना बसला असून त्यांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. तात्काळ अध्यादेश न निघालेस ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ आझाद मैदानावर’ राज्यव्यापी बेमुदत आंदोलन छेडले जाईल.”
प्रा. जोतीराम सोरटे
समन्वयक, नेटसेट, पीएचडी. धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.