कसबा वाळवे येथे महाआरोग्य शिबीर -परिसरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा-आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे आवाहन

कसबा वाळवे येथे महाआरोग्य शिबीर -परिसरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
सिंहवाणी ब्युरो/ बिद्री
शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करुन मोफत उपचार करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम कसबा वाळवे येथून सुरु करत तो राज्यभर राबविण्याचा मानस आहे.कसबा वाळवेचे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेते स्वर्गीय भरत पाटील यांच्या जयंती निमित्त शिबिराचे आयोजन केले असून या पुढील काळात आरोग्य शिबीरे राबवून आरोग्याची वारी दारोदारी नेणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवे येथे कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय भरत आण्णा पाटील यांच्या जयंती निमित्त भव्य आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आहे.या पाच दिवसीय शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी नामदार प्रकाश आबिटकर बोलत होते.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, सरपंच वनिता पाटील, शरद सुतगिरणीचे व्हा. चेअरमन अशोक फराक्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत व प्रास्ताविक युवा नेते मानसिंग पाटील यांनी केले.सीईओ.एस कार्तिकेयन, अशोकराव फराक्टे यांनी या शिबिराचे फायदे या मनोगतातून विषयी सांगितले
आरोग्य शिबिरांचे आयोजन फक्त दिखाव्यासाठी उत्सवासाठी न करता जनतेच्या सेवेसाठी राबविणे आवश्यक आहे. सामान्य लोकांपर्यंत चांगल्या आरोग्य सेवा सुविधा पोहचणेसाठी आपण प्रयत्नशील असावे. कसबा वाळवे परिसरातील सर्व नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
यावेळी नागरिकांच्यासाठी श्रवण यंत्रे, वयोवंदना कार्ड, क्षयरोग रुग्णांना धान्य किट वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी विविध तपासणी, उपचारासाठी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वर्गीय भरत आण्णा पाटील, अशोकराव फराक्टे युवा मंच व आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य व जी प. कोल्हापूर यांच्यावतीने या शिबिराचे संयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी तज्ञ डॉ.अक्षय बाफना, राधानगरी गट विकास अधिकारी संदीप भंडारी, आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्ये, डाँ. वर्षा पाटील, डाँ मिलिंद कदम,उपसरपंच संग्राम पताडे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय बलुगडे, भाजपचे नेते महेश पाटील, भाऊ पालकर, हिंदूराव खोत,नईम अत्तार,यांच्यासह सीपीआर हाँस्पिटल कोल्हापूर ची तज्ञ डाँक्टर, तंत्रज्ञ, सहाय्यक, जिल्हा परिषद चे आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वंयसेविका, कसबा वाळवे परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्र संचालन अमित कांदळकर व मोहिते यांनी केले तर आभार जयवंत पाटील यांनी मानले.
फोटो –
कसबा वाळवे येथे नेते भरत पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, डावीकडून सरपंच वनिता पाटील, अशोकराव फराकटे, एस कार्तिकेयन, उपसरपंच संग्राम पताडे, मानसिंग पाटील
छाया:-अद्वैत फोटो कसबा वाळवे