खानापूर मध्ये रंगला ‘जागर स्वातंत्र्याचा’ : मावळा प्रतिष्ठानकडून शिवकालीन युद्ध कलेचे आयोजन: वर्गांना दिली गड, किल्ल्यांची नावे; देशातील पहिलाच उपक्रम

खानापूर मध्ये रंगला ‘जागर स्वातंत्र्याचा’ :
मावळा प्रतिष्ठानकडून शिवकालीन युद्ध कलेचे आयोजन:
वर्गांना दिली गड, किल्ल्यांची नावे; देशातील पहिलाच उपक्रम
सिंहवाणी ब्युरो /सागर मोरे, गारगोटी
मावळा प्रतिष्ठान गड संवर्धन, कोल्हापूर यांचेमार्फत ‘जागर स्वातंत्र्याचा’ या कार्यक्रमाचे आयोजन खानापूर (ता.भुदरगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा येथे करण्यात आले होते. केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, शरद सहकारी सूतगिरणीचे नूतन संचालक बाळासाहेब भोपळे, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, सरपंच शोभा गुरव, उपसरपंच संदीप गुरव, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गनमाळे प्रमुख उपस्थित होते.
स्वातंत्र्यादिनानिमित्त मावळा प्रतिष्ठान कडून प्रत्येक वर्षी जागर स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम विविध शाळांमध्ये आयोजित केला जातो. यानिमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये भाषण, चित्रकला, निबंध स्पर्धाचे आयोजन केले होते. विजेत्या मुलांना सन्मानचिन्ह व शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले. स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. शाळेमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी मावळा प्रतिष्ठान कडे जी शालेय साहित्य मदत म्हणून जमा केली होती त्याचे सुध्दा वितरण गरीब विद्यार्थ्यांना करण्यात आले.
व्हीडिओ पहा
यावेळी मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळेमध्ये शिवकालीन युद्धकलेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लाठीकाठी, तलवार बाजी, दांडपट्टा,विटा फेक तसेच थक्क करणारी युद्ध कला सादर करण्यात आली.
मावळ्यांनी व रणरागिणीनी आपल्या युध्द कलेचे सादरीकरण करताना उपस्थितांना थक्क करणारी, अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके सादर केली. या युद्धकलेतून उपस्थितांनी शिवकाळच अनुभवला असे वाटले. या शिवकालीन युद्धकलेसाठी वस्ताद संदिप लाड सर व संपूर्ण टिम (कोल्हापूर) वस्ताद संपत पाटील (गिरगाव), वस्ताद तानाजी पाटील (मालवे) व शिवकालीन युद्ध कलेमध्ये पारंगत असणाऱ्या मावळ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. हलगी सम्राट मारुती मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट हलगी वादन केले. गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे यांनी प्रविण तावडे यांच्या कल्पकतेचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, मानसिंग दबडे, प्रवीणसिंह सावंत, मुख्याध्यापिका सुनिता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप घरपणकर,
संदीप पाटील,ऋषिकेश जाधव, विजय पाटील, विनू शिंदे, सुरज कदम, माणिकराव तावडे, विक्रम तावडे, कांतिभाई पटेल, प्रविण कोळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी खानापूर येथील प्रविण तावडे व त्यांचे कुटुंबीय, मावळा प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी कष्ट घेतले. गड-किल्ल्यांच्या माहितीसाठी सचिन गिरगावे यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुजाता देसाई व रूपाली राऊळ यांनी केले. युवराज नाईक यांनी आभार मानले.
——–
शाळेतील वर्गांना गड किल्ल्यांची नावे: देशातील पहिलाच उपक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व राजमाता जिजाऊच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यवंत भुदरगड भूमीला एक ज्वलंत असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या भूमीमध्ये अनेक शुरवीर मावळे व क्रांतिकारक होऊन गेले. हा इतिहास जिवंत राहण्यासाठी व लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य याची जाणीव जागृती व्हावी, आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत राहण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून अंगणवाडी पासून इयत्ता सातवी पर्यंतच्या सर्व वर्गांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही गडकिल्ल्यांची नावे दिली आहेत. ज्यायोगे मुलांना त्यामधून प्रेरणा तर मिळेलच पण आपला ज्वलंत इतिहास सुध्दा जागृत राहील आणि यातूनच एक सामर्थ्यशाली व सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. वर्गांना गड व किल्ले यांची नावे देणे हा महाराष्ट्र नाही तर देशातील पहिला उपक्रम आहे आणि हा उपक्रम विक्रम तावडे व प्रविण तावडे यांनी आपल्या कल्पक बुद्धीने मांडला व पार पाडला. या कल्पनेचे समाजातील विविध स्तरांवर कौतुक होत आहे.
—–
: हालगी कडाडली…
खानापूर येथील हलगी सम्राट मारुती मोरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट हालगीपट्टू म्हणून नावाजलेले आहेत. यांच्या हालगीच्या आवाजाच्या कडकडाटाने शिवकालीन युद्ध कलेचे सादरीकरण करणाऱ्या मावळे व रणरागिणींच्या अंगावर रोमांच उभे केले. या हलगीला कैताळ व घुमके याची साथ लाभल्याने परिसरातील वातावरण शिवमय झाले होते.
——-
फोटो : खानापूर: येथील आदर्श शाळेत वर्गांना गडकिल्ले यांची नावे देणेत आली. या नामकरण सोहळा अनावरण प्रसंगी अर्जुन आबिटकर, डॉ.शेखर जाधव, प्रविण तावडे, बी.डी.भोपळे व इतर मान्यवर.
तर दुसऱ्या छायाचित्रात युद्धकलेची प्रात्यक्षिके.
———-