सिंहवाणी विशेष
*राहुल, आता ब्रह्मास्त्राचा वापर कर !*
ईव्हीएम हटावो, देश बचाओ* याशिवाय दुसरा पर्याय नाही. ✍🏻 प्रेमकुमार बोके
प्रिय राहुल
आजपासून पुन्हा एका नव्या यात्रेला तू सुरुवात करीत आहेस.ऑगस्ट महिन्याला भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.१९४२ च्या ९ ऑगस्टला महात्मा गांधींनी इंग्रजांना *चले जाव* चा नारा देऊन स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते आणि १९४७ च्या १५ ऑगस्टला इंग्रजांना भारत सोडून जावे लागले.आता २०२५ च्या १७ ऑगस्टला बिहारमध्ये निघालेली तुझी *वोटर अधिकार यात्रा* या संविधान विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी निश्चितच कारणीभूत ठरणार आहे.भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेला मतदानाचा सर्वात पवित्र अधिकारच हिरावून घेण्याचे षडयंत्र या देशात सुरू असल्यामुळे तू *वोटर अधिकार यात्रा* काढून लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हुकूमशाही सरकार विरोधात रणशिंग फुंकल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन ! लबाडी करून मिळवलेली सत्ता आणि सर्व स्वायत्त संस्थांना धमकावून आपल्या बाजूने केलेल्या प्रचंड शक्तिमान शासकीय व प्रशासकीय यंत्रणेसोबत तू निर्भीडपणे देत असलेली टक्कर निश्चितच येणाऱ्या काळासाठी आशादायी आणि प्रेरणादायी आहे.प्रचंड टीका,विरोध,बदनामी,चारित्र्यहनन निंदानालस्ती,आई-वडील,बहीण, आजी,आजोबा या सर्वांची टिंगल टवाळी आणि बदनामी सहन करत आज तू देशाचा केंद्रबिंदू झालास. आज देशातील वातावरण तुझ्या अवतीभवती फिरत असून सर्वत्र तुझ्याच नावाची चर्चा आहे आणि तीही सकारात्मक आहे.कोणत्याही टीकेने खचून न जाता अतिशय धीरोधात्तपणे तू या सर्व टीकाकारांचा सामना करत आज जगाला तुझी दखल घ्यायला भाग पाडलेस.जो मीडिया १०० % तुझ्या विरोधात होता, आज तोच मीडिया तुझ्या प्रत्येक स्टेटमेंटची दखल घ्यायला लागला.यातच तुझे सामर्थ्य आणि येणाऱ्या काळातील यशाची नांदी दिसून येते.शेकडो केसेस अंगावर झेलून कुठेही *माफीवीर* न बनता आपल्या विचारांवर ठाम राहणारा तू आधुनिक काळातील खरा गांधी आहेस.*गांधी* या नावाची या देशातील काही इंग्रज धार्जिण्या लोकांना पूर्वीपासून ॲलर्जी आणि धास्ती आहे.त्यामुळे या चुगलखोरांनी सातत्याने गांधी नावाची बदनामी केलेली आहे. *गांधी* या नावाचे या देशाकरिता अमूल्य योगदान असतानाही त्यांच्या संदर्भात सातत्याने कुचाळकी,टवाळकी करणारा एक जात्यंध आणि वर्णवर्चस्ववादी वर्ग या देशात पूर्वीपासून कार्यरत आहे.त्याचा फटका तुला सुद्धा बसला,परंतु महात्मा गांधींपासून तर राहुल गांधी पर्यंत कोणताच गांधी कधी झूकत नसतो,वाकत नसतो आणि व्यवस्थेला शरण जात नसतो हे तू दाखवून दिले आहेस.ऐन तारुण्यात आफ्रिकेतील गोऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा मोहनदास करमचंद गांधी आणि जवळपास त्याच वयात भारतातील वर्णवर्चस्ववाद्यांसोबत अहिंसक मार्गाने संघर्ष करणारा राहुल राजीव गांधी यामध्ये बरेच साम्य आहे.
प्रिय राहुल, *गांधी* या नावाने या देशाला खूप काही दिले आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तर स्वातंत्र्यानंतर देशाची उभारणी करण्यासाठी गांधी या नावाचे खूप मोठे योगदान आहे.हे योगदान देताना तीन गांधींना आपले प्राणही गमवावे लागले.परंतु त्याची कदर आणि किंमत येथील मनुस्मृतीच्या समर्थकांना नाही.ज्यांच्या नसानसात नथुराम गोडसेचे रक्त धावत आहे, ते लोक गांधींच्या योगदानाला कधीही मान्य करू शकणार नाही.राहुल, ज्या वेगाने त्यांनी तुझी बदनामी केली त्याच वेगाने आता सर्वसामान्य लोक तुझ्या संघर्षाचे कौतुक करत आहे.संपूर्ण देश पायी चालून अभ्यासताना तुझ्यामध्ये असलेली चिकाटी,जिद्द,संयम आणि कितीही मोठ्या संकटाला तोंड देण्याचे धैर्य यामुळे आज लाखो तरुण तुला आदर्श मानत आहे.एकीकडे लोक ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मारामाऱ्या करीत असताना तुझ्या आईने हातात चालून आलेले प्रधानमंत्री पद सहजपणे नाकारले.तरीसुद्धा त्या माऊलीचे चारित्र्यहनन करताना तथाकथित संस्कृती रक्षकांना जराही लाज वाटली नाही.पण तुझ्या आईने कधीही कोणाबद्दल अपशब्द वापरले नाही किंवा त्यांना प्रत्युत्तरही दिले नाही. तीच सभ्यता,तेच संस्कार,तोच संयम तुझ्या नसानसात भरलेला आहेस.सत्ताधारी आणि भांडवलशाहीचा अंकित आणि गुलाम झालेला येथील मीडिया जेव्हा तुला पप्पू ठरवण्याच्या नादात पत्रकारितेची सर्व नीतिमुल्ये गमावून बसला होता; त्याच मीडियाला आज तुझ्या एका एका वाक्याची दखल घ्यायला तू भाग पाडलेस.यातच तुझा विजय आणि इथल्या विकल्या गेलेल्या मीडियाचा पराभव आहे.या देशातील सर्व स्वायत्त घटनात्मक संस्था एकीकडे सरकारच्या बटिक झालेल्या असताना आणि त्या संस्थांनी तुला नामोहरम करण्यासाठी सर्व प्रकारचे कुप्रयत्न, कटकारस्थान,षडयंत्र रचलेले असतानाही तु ज्या हिमतीने आणि निडरपणे या संस्थांच्या प्रश्नांना सामोरा गेलास त्यातूनच तुझे चारित्र्य उजळून निघाले.आज त्याच स्वायत्त संस्थांमधील एकेका संस्थेचे वाभाडे रोज सुप्रीम कोर्ट काढत आहे.या सर्व स्वायत्त घटनात्मक संस्थांची नालायकी जगासमोर आणण्यासाठी तुझाच संघर्ष कारणीभूत आहे. खोटारड्या निवडणूक आयोगाला जर आरोपीच्या पिंजऱ्यात कोणी उभे केले असेल तर ते फक्त आणि फक्त गांधी आडनावाच्या राहुलनेच ! भारतीय समाजकारण,राजकारण, धर्मकारणाचा कवडीचाही अभ्यास नसलेले टुकार लोक जेव्हा तुझ्यावर खालच्या भाषेत टीकाटिपणी करतात; तेव्हा या देशाच्या तरुण पिढीच्या मेंदूत किती विष भरवल्या गेले आहे याची प्रचिती येते.सत्ताधाऱ्यांना जरी याचा अघोरी आणि विकृत आनंद होत असला तरी केवळ सत्तेच्या लालसेपोटी या देशाचे भवितव्य असलेल्या तरुण पिढीचे आयुष्य त्यांनी बरबाद केलेले आहे ही फार वेदनादायी बाब आहे.
प्रिय राहुल, देशाची परिस्थिती अत्यंत भीषण,भयानक आणि विदारक आहे.हा देश जवळजवळ विकल्या गेलेला आहे.आता तर मतांचा अधिकारच काढून घेण्याचे कारस्थान सुरू आहे.सामान्य माणसांना त्यांच्या रोजी रोटीचाच प्रश्न असल्यामुळे खोलात जाऊन विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.कारण एकीकडे या सरकारने लोकांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे आणि दुसरीकडे आपले मूलभूत अधिकारच संपविण्यात येत आहे हे आमच्या लक्षात येऊ नये म्हणून धर्म नावाच्या अफूच्या गोळीने आम्हाला बेभान, बेधुंद आणि बेशुद्ध करून टाकले आहे.त्यामुळे या देशातील फार कमी लोक देशाच्या भवितव्याची चिंता करताना दिसून येतात.या देशाला उभे करण्यासाठी असंख्य लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे.भारताला महान संत,विचारवंत,महापुरुष आणि तत्वज्ञांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे.एकेकाळी भारत हा जगासाठी ज्ञानाचे केंद्र होता.परंतु आज या देशातील संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थाच उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मनुवादी विकृती घुसवण्याचा सरकार केंद्रित प्रयत्न सुरू आहे.अशा भयानक परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता तू रस्त्यावर उतरून देशाची लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहे ही देशासाठी आशेचा किरण दाखविणारी गोष्ट आहे.दिवसेंदिवस तुला मिळणारा पाठिंबाही वाढत आहे.सरकारने सर्व स्वायत्त संस्था आपली माणसे घुसवून पूर्णपणे काबीज केलेल्या आहेत.त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईत जरी आपण जिंकत असलो तरीसुद्धा ईव्हीएम मशीनच्या लढाईत मात्र आपण आणखीही पराभूत होणार आहोत.कारण या लोकांची नालायकी आणि विकृती कधीच संपणार नाही. त्यांची ती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधात प्रचंड जनमत जागृत झालेले असताना तुला आता ब्रह्मास्त्राचा वापर करणे आवश्यक आहे.सर्व विरोधी पक्षाचे नेते तुझ्यासोबत आहे.अशा वेळी आता *ईव्हीएम वर पूर्णपणे बहिष्कार आणि पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका* ही शिव गर्जना जर तू केली तर देशामध्ये क्रांती होऊ शकते आणि सरकारमध्ये हाहाकार उडू शकतो.त्यामुळे आता तुला देशाच्या हितासाठी हा निर्णय घेणे गरजेचे आहे.त्याशिवाय तुझ्या संघर्षाला फळ येणार नाही.ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि त्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर *ईव्हीएम हटावो, देश बचाओ* याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता शिल्लक नाही.तेव्हा तू या सूचनेचा गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती.तुझ्या निडर,निर्भीड,निस्पृह संघर्षाला हृदयापासून सलाम !
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
Back to top button