जिल्हाताज्या घडामोडी

कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई : अमोल ठाकूर — शिरोळ पोलीस ठाणे येथे रेकॉर्डवरील ७४ गुन्हेगारांना कडक सूचना

कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई : अमोल ठाकूर


शिरोळ पोलीस ठाणे येथे रेकॉर्डवरील ७४ गुन्हेगारांना कडक सूचना


सिंहवाणी ब्युरो / शिरोळ
आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहिम राबवली . त्याचाच भाग म्हणून शिरोळ पोलीस ठाणे येथे जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत चार पोलीस ठाण्याममधील विविध प्रकारचे गुन्हे करणार्‍या तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस अधिकाऱ्यांनी कडक भाषेत सूचना दिल्या .
दरम्यान, जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आगामी सणासुदीच्या काळात कायद्याचे पालन करून गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याच्या सक्त सूचना दिल्या. यापुढे कोणत्याही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यास मोका, हद्दपारी व एमपीडीए सारख्या कठोर कायद्याअंतर्गत थेट कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी ही कारवाई केली.
शुक्रवारी झालेल्या या विशेष कॅम्पमध्ये जयसिंगपूर पोलीस उपविभागीय स्तरावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिरोळ पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले व वडगाव पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याने विविध प्रकारचे गुन्हे करणारे तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या ७४ रेकॉर्डवरील आरोपींना हजर होते. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता अन्वये सर्व आरोपींकडून वैयक्तिक जातमुचलके घेण्यात आले. त्याचबरोबर दोन प्रतिष्ठित व्यक्तींना जामीनदार ठेवून, चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला असून
जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत व सुरक्षिततेत पार पडण्यास मदत होणार आहे. यावेळी पो नि शिवाजीराव गायकवाड , पो नि सत्यवान हाके, पो नि प्रमोद शिंदे ,पो नि शरद मेमाने यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button