लाच घेतल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी चव्हाण निलंबित: 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना झाली होती अटक

लाच घेतल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी चव्हाण निलंबित:
40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना झाली होती अटक
सिंहवाणी ब्युरो / सावंतवाडी
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले मळगावचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी निलंबित केले.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या घराचे घर पत्रक उतारे देण्यासाठी चव्हाण यांनी एक लाख रुपयाची मागणी केली होती. त्यातील 40 हजार रुपयांची रक्कम लाचेच्या स्वरूपात स्वीकारताना सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
या कारवाईत मळगाव येथील वृक्षवल्ली गृहनिर्माण प्रकल्पातील घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे विकास विजय नाईक यांनी मळगाव ग्रामपंचायतीकडे घर पत्रक उतार्यासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र आठ ते नऊ महिने घर पत्रक उतारे देण्यात टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांची विजय नाईक यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 40 हजारांवर तडजोड करण्यात आली.
नाईक यांनी ज्ञानेश्वर चव्हाण यांना फोन केल्यानंतर त्यांनी सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी सदरची रक्कम स्वीकारताना ज्ञानेश्वर चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
ज्ञानेश्वर चव्हाण यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दिले