शिक्षण संस्थांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे: नाम. चंद्रकांत पाटील; घाळी समाजभूषण पुरस्कार जनसेवा बँकेचे हिरेमठ यांना प्रदान!

शिक्षण संस्थांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे: नाम. चंद्रकांत पाटील;
घाळी समाजभूषण पुरस्कार जनसेवा बँकेचे हिरेमठ यांना प्रदान!
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षण संस्थांनी नवे संशोधक तयार करणे गरजेचे आहे. ज्या देशाने अमेरिकेतून लाल गहू आणून आपली माणसे वाचवली. त्याच देशाची कोरोनाची लस जगातील साठ देशांनी मागविली. अशा भारतात आपण राहत असून, नवे संशोधक तयार करण्यासाठी शिक्षण संस्थांनी नव्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमात उतरावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
गडहिंग्लज येथे आयोजित डॉ. एस एस . घाळी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. पुणे येथील जनसेवा सहकारी बॅकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना ना. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ. हिरेमठ म्हणाले, समाजोन्नतीसाठी झटणाऱ्या सर्व प्रतिनिधींचा हा पुरस्कार असून, विद्यार्थी परिषदेची शिकवण ही आयुष्यात यशस्वी व्हायला उपयोगी ठरली. कौशल्य शिक्षण घेणे आता आवश्यक असून, पारंपरिक शिक्षणाचे महत्त्व कमी होत चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री पाटील म्हणाले, डॉ. हिरेमठ हे त्यांच्या व्यंगामुळे कधीच थांबले नाहीत. गडहिंग्लज भागातील हा हिरा देशाच्या विविध क्षेत्रांत काम करीत आहे. पुणे येथे शैक्षणिक तसेच बॅकिंग क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. आगामी काळात पाच विदेशी विद्यापीठे देशात येत असून, भारतातील चांगली विद्यापीठे आपण महाराष्ट्रात आणत आहोत. गावोगावी संशोधक तयार करणे गरजेचे आहे. याकडे नाम. पाटील यांनी लक्ष वेधले. डॉ. सतीश घाळी यांनी अध्यक्षीय भाषण केले. ॲड. बी. जी. भोसकी यांनी आभार मानले.