कोल्हापूर शहरात नवीन ‘एरिया’ येणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हद्दवाढीचे संकेत;
शेंडा पार्कात महापालिकेची नवी इमारत;
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
कोल्हापूर वाढतेय, आणखी वाढणार आहे. कोल्हापुरात लवकरच नवीन ‘एरिया’ येणार आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीचे संकेत दिले. कोल्हापूर महापालिकेची शेंडा पार्क येथे नवी इमारत होणार आहे, त्याकरिता पाच एकर जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिल्याचेही त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शंभर कोटींचे शहरातील रस्ते दर्जेदार नसतील, तर त्याची चौकशी करू आणि त्यानंतरच निधी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका इमारतीसाठी जिल्हाधिकार्यांनी दोन एकर जागा दिली होती. आता कोल्हापूर वाढणार असल्याने प्रशस्त इमारत असावी, याकरिता आणखी तीन एकर जागा द्यावी, असे आदेश दिल्याचे सांगत पवार म्हणाले, जीएसटी परताव्याचा महापालिकांना देण्यात येणार्या निधीचा फेरआढावा घेतला जाणार आहे.
शहरातील 100 कोटींच्या रस्त्यांसाठी 23 कोटी दिले आहेत. उर्वरित रक्कमही देऊ; पण रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत. खराब रस्त्यांची चौकशी झाल्याखेरीज निधी देणार नाही. प्रसंगी वसूलही करू, त्याद़ृष्टीने आयुक्त कार्यवाही करतील, असेही त्यांनी सांगितले. शेंडा पार्क येथील कृषी विभागाच्या 100 एकर जागेत आयटी पार्क होणार आहे. त्यातून लवकरच मार्ग निघेल. शाहू मिल येथील शाहू स्मारकासाठी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याशी चर्चा झाली.
विमानतळाची धावपट्टी 3 हजार मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे, त्याच्या प्रक्रियेसाठी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पूरग्रस्त भागात भरावाऐवजी पिलर अथवा डक्टच टाकून रस्ते करण्यात येणार आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावाच्या कामाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असेही त्यांनी सांगितले. महामंडळावरील नियुक्ती झालेली नाही, म्हणून कोणते काम तटले आहे का? असा सवाल करत या नियुक्तींचा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, ते त्याबाबत निर्णय घेतील.
महापालिकांना जीएसटीच्या योग्य परताव्याबाबत फेरआढावा घेतला जाईल. राज्यात 1972 पासून कोणतेही नवे मद्य परवाने दिले नाहीत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांना मागण्या करण्याचा अधिकार आहे. मात्र, शासनाला कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
टोल नाक्यावर न्यायालयाचा निकाल दाखवा अन् बिनधास्त जा
खराब आणि खड्डेमय रस्त्यांवर टोल आकारू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाचा हा निकाल दाखवा आणि बिनधास्त जा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खराब रस्ते, टोल याविषयी विचारणा केली असता पवार यांनी त्यांना उत्तर दिले. दरम्यान, सर्किट हाऊस येथे पवार यांच्याकडे गार्हाणी मांडण्यासाठी सोमवारी सकाळी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली
Back to top button