अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणांमार्फत तपासणीची शक्यता; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता झाली दोडकी.. गरज सरो आणि..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणांमार्फत तपासणीची शक्यता;
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता झाली दोडकी.. गरज सरो आणि..
सिंहवाणी ब्युरो / अहिल्यानगर :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र-अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी नकार दिल्याने गेल्या काही दिवसांपासून तपासणीचे काम बंद पडले आहे. त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचे काम सुरू करण्याची मोहीम सरकारकडून हाती घेतली जाणार आहे. महिला बालकल्याण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली. तपासणी मोहीम अन्य शासकीय यंत्रणांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
अर्ज योग्य प्रकारे छाननी न करताच
त्या वेळी पात्र का केले ❓
कालपर्यंत लाडकी असलेली बहीण आज दोडकी बहीण होत आहे जेव्हा ही योजना सरकारने आणली त्यावेळी गल्लोगल्ली फिरून बहिणींना अर्ज करायला प्रवृत्त केले गेले त्यावेळी योग्य पद्धतीने छाननी करून पात्र लाभार्थींची यादी बनवायला हवी होती पण शासनाने तसे केले नाही आणि कालांतराने टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींना बोगस बहिणी म्हणून अपात्र ठरविण्यात येऊ लागले ज्या महिलांनी हेतू पुरस्कार चुकीची माहिती देऊन लाभ घेतला त्यांना जरूर वागळावे पण पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वेळेला अपात्रतेची टांगती तलवार कशासाठी असा सवाल लाडक्या बहिणीतून होत आहे
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचा फायदा सरकारला मिळाला. मात्र, योजनांसाठी प्राप्त झालेले लाभार्थ्यांचे अर्ज योग्य प्रकारे छाननी न करताच सरसकटपणे लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आल्याने अनेक अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख २५ हजार लाडक्या बहिणींची यादी महिला बालकल्याण विभागाला पाठवून यातील पात्र बहिणींची तपासणी मोहीम सुरू करण्यास सांगितले.
मात्र, या तपासणीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नकार दिला. त्यामुळे जिल्ह्यात हे काम काही दिवसांपासून जवळपास बंद पडले आहे. आत्तापर्यंत अवघ्या ४० हजार बहिणींचे अर्ज तपासण्यात आले. आता या कामाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने अन्य शासकीय यंत्रणांना या मोहिमेत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ११ लाख ५० हजारांवर महिला या योजनेत सुरुवातीला पात्र करण्यात आल्या. दोन महिन्यांपूर्वी यातील चारचाकी वाहन नावावर असलेल्या २२ हजार महिलांची यादी राज्यस्तरावरून महिला बालकल्याण विभागामार्फत नगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सादर करण्यात आली. मात्र, या यादीतील किती लाभार्थी अपात्र ठरल्या, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. असे असतानाच आता पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा १ लाख २५ हजार महिलांची दुसरी यादी महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली आहे. या यादीनुसार एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणीची प्रत्यक्षात अथवा फोन करून पडताळणी करण्याचे तोंडी आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मात्र, नावांची पडताळणी करताना स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका व लाभार्थी योजनेतील महिलांचे वाद होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या कामास नकार दिला. शिवाय यामुळे मूळ काम असलेले पोषण आहार वाटपाचे काम बंद पडेल असेही कारण या संघटनांनी पुढे केले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत १ लाख २५ हजार लाडक्या बहिणीपैकी ४० हजार महिलांची पडताळणी होऊ शकली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अन्य सरकार यंत्रणांकडे हे काम सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्या दृष्टीने महिला बालकल्याण विभागाने चाचपणी सुरू केली.