भुदरगड तालुक्यातील “म्हातारीचे पठार” पर्यटनस्थळाची पर्यटकांना भुरळ: भरपावसाळ्यात एकदातरी म्हातारीच्या पठाराला भेट द्यायलाच हवी

भुदरगड तालुक्यातील “म्हातारीचे पठार” पर्यटनस्थळाची पर्यटकांना भुरळ
भरपावसाळ्यात एकदातरी म्हातारीच्या पठाराला भेट द्यायलाच हवी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील “म्हातारीचे पठार” हे पर्यटनस्थळ पर्यटकांना भुरळ घालत आहे. घोंगावणारा वादळी वारा.ढगांचे लोटच्या लोट. भरुन आलेले काळेकाळे ढग. डोंगरावर धुक्याची पांघरुणे, आपण आवकाशात आहोत असाच भास होत रहातो. यासाठी भरपावसाळ्यात एकदातरी म्हातारीच्या पठाराला भेट द्यायलाच हवी. भुदरगड किल्ल्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हातारीच्या पठाराचे तरुणाईला खूप आकर्षण आहे. भुदरगड तालुक्यातील म्हातारीचे पठार हे ठिकाण अकरा वर्षापुर्वी उजेडात आले. पवनचक्की प्रकल्पामुळे हा परिसर लोकांनी पाहिला. जेव्हा प्रथमच हा घनदाट झाडीचा प्रदेश पर्यटकांनी पाहिला तेव्हापासून या निसर्गरम्य परिसराची तारुणाईला भुरळ पडली आहे.
गारगोटी पासुन दहा किलोमीटर अंतरावर दक्षिणेस असलेल्या किल्ले भुदरागडकडे सतत पर्यटक येतात.भुदरगडला भेट दिलेल्या पर्यटकाला म्हातारीचे पठार खुणावत रहाते. श्रावण- भाद्रपद महिन्यात येथे धुक्याचे लोट पहायला मिळतात,सोसाट्याचा वारा.घनदाट वनराईचा विस्तीर्ण प्रदेश येथूनच दिसतो. सद्या वर्षा सहलीचा हंगाम सुरु आहे.शालेय सहली या पठाराला भेटी देतात.हा सगळा परिसर वन विभागाच्या ताब्यात आहे. म्हातारीच्या पठारावर तुम्ही पोहचला की तुम्हांला दिसतात शेकडो गायीगुरांचे कळप. फुलपाखरांचे नयनरम्य भिरभिरत जाणे.रानफुलांचे कित्येक नमुने,सद्या कळाई,नाल,गवर,भांगिरा मोठ्या प्रमाणात फुलली आहे. रानपक्षांची किलबील, माडाचे हिरवे पोपटी तोरण.श्रावणातली रानफुले,रानभाज्या तुम्हाला पहायच्या असतील तर तुम्हांला हा परिसर पहायलाच हवा. गारगोटी पासुन किल्ले भुदरगड मार्गे जकिनपेठ गावातून दक्षिणेकडे पठारावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. पर्यटकांना हा परिसर खूप आवडतो. कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पर्यटन स्थळ म्हणून पर्यटक या ठिकाणाकडे आकर्षित होत आहेत.सद्या या पठारावर एकही पवनचक्की उभी नाही.चारवर्षापुर्वी येथे पवनचक्या होत्या . शासनाने या पर्यटनस्थळाचा विकास करुन पर्यटकांना सोई उपलब्ध करुन दिल्यास येथे पर्यटन व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत.
म्हातारीचे पठार येथिल वनहद्दीत रानगवा,सांबर,भेकर,
बिबट्या, रानडुक्कर, साळींदर,कोल्हा ,तरस,
ससा,लांडगा, मोर,गरुड, घार,रानकोंबडा, कवडा,चतूर या वन्य प्राणी पक्षांचा मुक्त संचार आढळतो.