देऊळवाडीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन : पोलिस निरीक्षक लोंढे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात

देऊळवाडीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन : पोलिस निरीक्षक लोंढे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
देऊळवाडी ग्रामस्थांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा आदर्श घालून दिला आहे. गावाशेजारील खाणीत गणेश मुर्ती व निर्माल्य विसर्जन करताना भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे उद्घाटन भुदरगडचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते झाले.
यापूर्वी गावातील मुर्ती व निर्माल्याचे विसर्जन वेदगंगा नदीत होत असे. मात्र शासनाच्या आदेशानुसार यंदा ग्रामसभेने खाणीतील पाण्यात विसर्जन करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेतला. ग्रामस्थांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी विसर्जन सोहळ्यानंतर झिम्मा, फुगडीचा मनसोक्त आनंद लुटला.
याप्रसंगी प्रथम खाणीत गणेश विसर्जन करणाऱ्या गणपती कांबळे यांचा पोलिस निरीक्षक लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांचा गौरव शिवाजी आबा पाटील, ॲड बाजीराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळवंत पाटील व ग्रामपंचायत पदाधिकार यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमाचे कौतुक ग्रामविकास अधिकारी कुलदीप देसाई यांनी केले. “ग्रामस्थांनी शासनाच्या आदेशाला प्रतिसाद देत नदीऐवजी खाणीत विसर्जन करून पर्यावरण संवर्धनाची कळकळ दाखवली असे ते म्हणाले.
यावेळी सरपंच सुनिता पाटील, उपसरपंच कविता सावर्डेकर, सदस्य सुभाष पाटील, सुनिता वसंत पाटील, संभाजी कांबळे, संगीता गणपती कांबळे, बाबुराव पाटील, शिवाजी गुरव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.