भुदरगड पोलिसांची धडक कारवाई : प्रेशर मीड वापरून डॉल्बी वाजविल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा,

भुदरगड पोलिसांची धडक कारवाई :
प्रेशर मीड वापरून डॉल्बी वाजविल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा,
साडेचार लाखांचे साहित्य जप्त
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रेशर मीडचा वापर करून डॉल्बी वाजवल्याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे. नांगरगाव (ता. भुदरगड) येथील साम्राज्य गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह डॉल्बी मालक व चालका अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत तब्बल ३२ प्रेशर मीड, डॉल्बी वाहन असे सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीत प्रेशर मीड व सिओटू गॅसचा वापर जिल्हादंडाधिकारी यांच्या बंदी आदेशाने निषिद्ध ठरविला आहे. मात्र बुधवारी नांगरगाव येथील साम्राज्य गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा कानठिळ्या बसविणारा आवाज करुन सर्वांना त्रस्त करून सोडले. पोलिसांनी तपासणी केली असता प्रेशर मीडचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉल्बी मालक सिद्धेश सागर पाटील (रा. अवधूत कॉलनी, गारगोटी, त्याचे कर्मचारी तसेच साम्राज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह नऊ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे करत आहेत.
भुदरगड तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीतील डाॅल्बीची प्रथमतः तपासणी करण्यात येते. प्रेशर मिड आढळल्यास काढून ठेवण्याच्या सुचेना दिली जाते. मात्र सुचनाकडे दुर्लक्ष करून जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिला आहे. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी डाॅल्बीविरोधात उघडलेल्या या धडक मोहिमे बद्दल कौतुक होत आहे.
फोटो
गारगोटी: डाॅल्बीसह भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतलेले वाहन